हजारो विद्यार्थ्यांनी पालकांसह घरीच केली योगसाधना
कोपरगाव (प्रतिनिधी) –तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ व आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या वतीने जागतिक योग दिन ऑनलाइन लाइव्ह साजरा करण्यात आला. या योगा ध्यान साधनेमध्ये हजारो विद्यार्थी, पालकांनी प्रात्यक्षिके करून सहभाग नोंदवला. करोना संसर्गजन्य विषाणूची लागण होवू नये, म्हणून प्रशासनाने सर्व शाळा बंद ठेवल्या असल्या, तरी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या विद्यार्थ्यांनी घरबसल्या योगाचे धडे देण्याचा अभिनव उपक्रम विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मालिक ध्यान योग मिशनच्या माध्यमातून राबविण्यात आला.
आज सकाळी सहा वाजता हा कार्यक्रम घेण्यात आला. आश्रमाचे योग गुरू संत योगानंद महाराज, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष कांतिलाल पटेल, प्राचार्य नामदेव डांगे, बाळासाहेब कोतकर, संदीप गायकवाड, माणिक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत योगसाधनेचा प्रारंभ करण्यात आला. योग गुरू संत योगानंद महाराज योगाचे धडे देताना म्हणाले, योगामुळे माणसाचे शरीर, मन, विचार, कृती, संयम व तृप्तता यांचा मिलाफ साधला जातो. योगाचा मूळ अर्थच शरीर व मनाचा समन्वित संगम, असा आहे. सध्याच्या करोनाच्या काळात योगाचे महत्त्व अधिक वाढले आणि ते जगाने स्वीकारले. म्हणूनच आज जगभर योगाचे धडे गिरवले जात आहेत. त्याची महती अधिक वाढावी, यासाठी आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात मुलांना दररोज ध्यान, योगाचे धडे दिले जात आहेत. देशाची भावी पिढी सक्षम, सुदृढ व निरोगी होण्यासाठी ओम गुरुदेव माऊलींनी आत्मचिंतन, ध्यानधारणा आणि योग साधनेची शिकवण दिली आहे. हा त्यांचा संदेश जगात प्रभावी ठरत आहे, असेही संत योगानंद महाराज यांनी सांगितले.
दरम्यान योग दिनानिमित्ताने ऑनलाइन लाइव्ह योगाचे धडे संत योगानंद महाराजांसमवेत साक्षी पवार व दीपक पवार दिले. राज्यासह देशातील तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी, पालक, शिक्षक, भाविकांनी योगाचे प्रात्यक्षिके करत योग दिन साजरा केला. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आश्रमाचे सर्व संत मांदियाळी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सरचिटणीस, सर्व विश्वस्त, पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब कोतकर, अजित पवार, शेषेंद्र त्रिपाठी, रवींद्र बेंद्रे, सुरेश शिंगोटे, जया जगताप, किशोर पवार, अर्जुन खेकडे, शिवाजी शिरसाट, विजय चाळक, सुनील गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.