लोकशाहीचा उत्सव उत्साहात

भर उन्हात तळपले मतदार; 5 वाजेपर्यंत 57 टक्‍के मतदान
मतदारांच्या केंद्रांसमोर लांबच लांब रांगा : महिलांच्या मतदानाचा टक्‍का वाढला

दिव्यांगांचे हाल
यंदा दिव्यांगांच्या मतदानाचा टक्‍का वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. त्यांना सेवा व सुविधा उपलब्ध करू देण्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात काही केंद्रांच्या ठिकाणी व्हीलचेअर उपलब्ध नसल्याने या मतदारांबरोबर आलेल्या व्यक्‍तींनी त्यांना मतदान केंद्रात नेले व आणले.

नगर – लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीचा उत्साह नगर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाला. नगर शहरासह ग्रामीण भागात मतदान केंद्रासमोर मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. प्रशासनाने केलेला दावा मात्र फोल ठरला असून सेवा व सुविधांचा दुष्काळ असल्याने भर उन्हात तळपतच मतदारांना मतदानाचा हक्‍क बजावला लागला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57 टक्‍के मतदान झाले होते. 18 लाख 54 हजार 248 मतदारापैकी 10 लाख 56 हजार 429 मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.

या पाच वाजेपर्यंतच्या मतदानाच्या आकडेवारीत शेवगाव व पाथर्डी विधानसभा मतदारसंघाने आघाडी घेतली होती. या मतदारसंघात 58.19 टक्‍के मतदान झाले होते. तर सर्वात कमी 54. 4 टक्‍के मतदान नगर शहरात झाले. विशेष म्हणजे यावेळी नगर शहरात मतदारांचा उत्साह वाढलेला दिसला. सकाळी साडेअकरानंतर बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. त्या उलट ग्रामीण भागात दुपारी 1 वाजेपर्यंत मतदान केंद्रापुढे रांगा होत्या. तर दुपारीनंतर गर्दी कमी झाली होती.

नगर लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीला ग्रामीण भागात मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले. पारनेर शहरात मतदान केंद्रावर ठिकठिकाणी मतदारांच्या रांगा दिसत होत्या. पारनेर शहर, रेनवडी, भाळवणी, गारगुंडी येथील मतदान मशीनमध्ये बिघाड झाल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली होती. बऱ्याच ठिकाणी मशीन बदलून दुसरी लावण्यात आली. त्यामुळे मतदान अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. पारनेर शहरात मतदान मशीन सुरू न झाल्याने पंधरा मिनिटे उशिरा मतदानाला सुरवात झाली. भाळवणी येथे मतदान मशीन बिघाड झाल्याने मतदानासाठी वाढीव वेळ द्यावा अशी मागणी करण्यात आली होती. तर काळेवाडी (सावरगांव) येथील मतदान मशीन सुरू करण्यात सव्वा तास वेळ लागला.

जामखेड तालुक्‍यात ठिकाणी मतदान मशीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. तालुक्‍यातील जवळा येथे दुपारी बारा वाजलेल्यापासून मतदान मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे सायंकाळी 7 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्याच्या रांगा होत्या. नान्नज येथील मतदान मशिनमध्ये बिघाड झाला होता. तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी रूपचंद जगताप यांची मतदान केंद्राला भेट देत मशील बदलले. पिंपरखेड येथील मतदान केंद्रावर मतदान मशीनमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून बिघाड झाला. दुसरे मतदान यंत्र आणल मात्रे तेही थोड्या वेळात बंद पडले. तिसरे मतदान यंत्र आणले ते सकाळी साडेआठ वाजता सुरू झाले.

शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सामनगाव येथे सुरू केलेल्या सखी मतदान केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाला. या मतदान केंद्रात सर्व कर्मचारी महिलाच होत्या. कडक उन्हाचा मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून या सखी मतदान केंद्रासमोर मोठा शामियाना उभारण्यात आला होता. त्यात विश्रांतीसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच लहान मुलांसाठी पाळणे, थंड हवेसाठी कुलर, पिण्यासाठी थंड जारचे पाणी, दिव्यांगासाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. या सखी मतदान केंद्रला आकार देण्यासाठी गट शिक्षणाधिकारी शैलजा राऊळ यांनी विशेष रूची दाखविली.

सकाळी 9 वाजेपर्यंत 7 टक्‍के मतदान झाले होते. त्यानंतर 11 वाजेपर्यंत हे मतदान 19 टक्‍क्‍यांपर्यंत गेले होते. दुपारी 1 वाजता 28 टक्‍के मतदान झाले. त्यावेळी सर्वाधिक मतदान हे नगर शहरात झाले होते. सुमारे 33.21 टक्‍के मतदान झाले. दुपारी 3 वाजता 45.61 टक्‍के मतदान झाले. सर्वाधिक पारनेर तालुक्‍यात 47. 85 टक्‍के मतदान झाले. यावेळीत सर्वात कमी मतदान 43.15 टक्‍के मतदान श्रीगोंदा तालुक्‍यात झाले होते. दुपारी चारनंतर मतदारांच्या मतदान केंद्रासमोर रांगा वाढल्या होत्या. त्यामुळे काही मतदान केंद्रांवर रात्री सात वाजेपर्यंत रांगा लागल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 56.97 टक्‍के मतदान झाले होते. त्यात शेवगावमध्ये 58.19 टक्‍के मतदान झाले होते. त्याखालोखाल पारनेरमध्ये 58.4, कर्जत-जामखेडमध्ये 57.57, राहुरी- 57.51, नगर शहर- 54.29, श्रीगोंदा- 55.92 टक्‍के मतदान झाले होते.

नगर शहरात सकाळी फारशी गर्दी नव्हती. परंतु साडेअकरानंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढली. त्यामुळे बहुतांशी केंद्रांवर रांगा दिसत होत्या. नगर तालुक्‍यासह कर्जत, जामखेड, शेवगाव, पारनेर या तालुक्‍यात सकाळीपासून मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या. मात्र दुपारनंतर केंद्रांवरील गर्दी कमी झाली होती. काही केंद्रांवर दुपारी चारवाजेपर्यंत मतदार फिरकलेच नाही. त्यामुळे या केंद्रांवर शुकशुकाट दिसत होता. एकाच ठिकाणी चार ते पाच मतदान केंद्र असलेल्या ठिकाणी तर काही केंद्रांवर रांगा तर काही केंद्र मतदारांच्या प्रतीक्षेत असे चित्र दिसत होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.