विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी दिल्या “प्रभात’ला शुभेच्छा
पुणे – आपल्या स्थापनेची 89 वर्षे पूर्ण करुन नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत, शताब्दीच्या दिशेने दमदार वाटचाल करणाऱ्या, सर्वसामान्य वाचकांच्या प्रश्नांचा आरसा असलेल्या दै. “प्रभात’चा वर्धापनदिन नारायण पेठेतील वा. ब. गोगटे प्रशालेच्या प्रांगणात पार पडला. सनईचे मंगल सूर, मनमोहक रंगावलीचे रेखाटन आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, लेखक-कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह सर्वसामान्य वाचकांच्या उपस्थितीत गोगटे प्रशालेचे आवार रविवारी संध्याकाळी फुलून गेले होते.
संस्थापक वा. रा. कोठारी यांच्या ध्येयनिष्ठ, व्यासंगी आणि विवेकी पत्रकारितेची कास धरत तब्बल 9 दशके समाजोन्नतीचा वसा घेत “प्रभात’ने लक्षावधी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने असंख्य वाचकांनी “प्रभात’वर शुभेच्छांचा वर्षाव करत आगामी वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांच्या स्वागतासाठी आकर्षक कमान आणि मनमोहक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. “प्रभात’च्या कार्यालयावरही आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
या शानदार सोहळ्याचा प्रारंभ कॉसमॉस बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सीए. मिलिंद काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे, शिवसेना नेते श्याम देशपांडे, कॉंग्रेसचे प्रदेश चिटणीस संजय बालगुडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. “दै. प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी, लेखाधिकारी रविकुमार इंडी आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. सनईवादक नितीन तुकाराम दैठणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरेल सनईवादनातून नाट्य आणि भक्तीसंगीताची सुरेल मैफल रंगवली. त्यांना हर्षद गुलानी (तबला), रमेश गुलानी (बासरी), रमेश काळे (हार्मोनियम) आणि मोहन दैठणकर (पेटी) यांनी साथसंगत केली. त्यांच्या सुरेल वादनाने मैफिलीत आणखीनच रंग भरला.
यावेळी “प्रभात’वर प्रेम करणारे असंख्य वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, वितरक यांनी गोगटे प्रशालेचे प्रांगण अक्षरश: गर्दीने फुलून गेले होते. एकमेकांना नव्या वर्षाच्या आणि वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देत आणि अल्पोपहारांचा आस्वाद घेत गप्पांची मैफल रंगवत वाचकांनीही या सोहळ्याचा मनमुराद आनंद लुटला. या अनोख्या आणि आनंददायी सोहळ्यात व्यापार, उद्योग, राजकीय, विधी, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, जाहिरात आणि पत्रकारिता क्षेत्रातील नागरिकांनी प्रभात’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे खासदार गिरीश बापट, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण, विधान परिषदेच्या सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, महापालिकेतील सभागृहनेते धीरज घाटे, महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार मेधा कुलकर्णी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी मंत्री रमेश बागवे, महापालिकेतील शहर अभियंता प्रशांत वाघमारे, स्मार्ट सिटीचे माजी सीईओ राजेंद्र जगताप, अस्मिता जगताप, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद कुंटे, शि. प्र. मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत आगस्ते, अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, अप्पर पोलिस आयुक्त प्रशासन संजय शिंदे, सहायक पोलिस आयुक्त विजय चौधरी, सहायक पोलिस आयुक्त अँटी करप्शन सुषमा चव्हाण, राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के, उपजिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी आदी मान्यवर उपस्थित होते.