नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा याने 13 नोव्हेंबर 2014 साली श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात केलेल्या द्विशतकी खेळीचे उजाळा देत स्मरण केले आहे. हिटमॅन रोहित शर्मासाठीही हा दिवस विशेष ठरला आहे. 2014 साली 13 तारखेलाच रोहितने श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर एकदिवसीय क्रिकेटमधील विक्रमी खेळी करून इतिहास रचला होता.
रोहितचा हा विक्रम आजही अबाधीत आहे. रोहितने ईडन गार्डनवर 264 धावांची विक्रमी खेळी केली होती. त्यात 33 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश होता. जागतिक क्रिकेटमध्ये हिटमॅन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रोहितने केलेल्या या ऐतिहासिक खेळीला आयसीसीने देखील आनंदाने उजाळा दिला आहे.
रोहितने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (नाबाद 200) आणि वीरेंद्र सेहवागचा (219 धावा) विक्रम या खेळीने मोडला होता. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके ठोकली आहेत. अशी कामगिरी करणारा रोहित जागतिक क्रिकेटमधील एकमेव फलंदाज आहे. रोहितने 2013 साली बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावा फटकावल्या होत्या. तर 2014 साली आजच्या दिवशी त्यानं 264 धावांची अफलातून खेळी केली होती. तर 2017 साली मोहालीत श्रीलंकेविरुद्धच नाबाद 208 धावांची खेळी केली होती.
आयसीसीनंही रोहितच्या या ऐतिहासिक खेळीचं स्मरण केलं आहे. रोहितचा फोटो ट्विट करून आजच्याच दिवशी 2014 रोजी रोहितने ही खेळी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. या सामन्यात रोहितला केवळ चार धावांवर श्रीलंकेने जीवदान दिले होते ते त्यांना प्रचंड महागात पडले.
शामिंडा एरंगाच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रोहितचा झेल सुटला होता. रोहितने ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला होता आणि तो बॅटची कड घेऊन उंच उडाला होता, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण करत असलेल्या थिसारा परेराला हा झेल घेता आला नव्हता. या सामन्यातील अखेरच्या षटकात शेवटच्या चेंडूवर नुवान कुलसेकराने रोहितला बाद केले. रोहितच्या या विक्रमी खेळीच्या जोरावर भारताने 404 धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेचा डाव 251 धावांवरच संपला व भारताने हा सामना जिंकला होता.