नगर – करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अवघं जग संकटात आहे. अशावेळी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन या वर्षीची रमजान ईद घरातच आनंदाच साजरी करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केली.
मुस्लिम समाजाला सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मुकुंदनगर परिसरास एचडीएफशी बॅंकेच्या एटीएमचे उद्घाटन करताना ते बोलत होते. शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, भिंगार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र सुद्रिक, मोहसीन शेख, फारूक शेख, वसीम सय्यद, आसीफ शेख, एचडीएफसी बॅंकेचे अधिकारी व मुकुंदनगरमधील नागरिक यावेळी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक सिंह म्हणाले, “”शहरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. करोनाचा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडूच नये. त्यातही अत्यंत गरजेच्या कामानिमित्त बाहेर पडल्यास फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क, सातत्याने सॅनिटायझरचे हात स्वच्छ करावेत.” या भागात एटीएम नसल्याने नागरीकांची मोठीच गैरसोय होती. ती दूर करण्यासाठक्ष रमजान ईदचा सणाच्या पार्श्वभूमीवर बॅंकेनेही सहकार्य केल्याचे सिंह यांनी सांगितले.
उपअधीक्षक मिटके यांनीही मनोगत व्यक्त केले. मुकुंदनगर परिसरात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव वास्तव्यास आहेत. या भागात एटीएम नसल्याने दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी दूरवर जावे लागे. पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीने ही चांगली सुविधा उपलब्ध झाल्याचे ते म्हणाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील यांच्यासह मोहसीन शेख, वसीम सय्यद, आसीफ शेख यांनी मनोगत व्यक्त केले.