कोजागिरी पौर्णिमा साजरी करा ‘बनारसी साडी’ नेसून..!

जाणून घ्या या 'क्लास टू मास' फेव्हरेट साडीची वैशिष्ट्ये

साडी हा एक पारंपरिक पोशाख आहे. जो कोणत्याही प्रसंगी, कोणावरही सुंदरच दिसतो. कोणता सण असो वा समारंभ, एक सुंदर साडी आपल्याला परिपूर्ण रूप देऊ शकते. तुमच्या वॉर्डरोबमध्ये बनारसी साडी असेल तर विचारूच नका! या वेळी कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला नववधूसारखे दिसायचे असेल तर बनारसी साडी नक्की नेसा.

बी टाऊनच्या सुंदरींनाही बनारसी साड्यांचा मोह आवरला नाही. माधुरी दीक्षित, काजोल, विद्या बालनपासून दीपिका पदुकोण, सोनम कपूर, अनुष्का शर्मापर्यंत अनेक अभिनेत्रींनी बनारसी साड्या नेसून स्वतःला मिरवलं आहे.

बनारसी साडी किंवा शालू हा देशभरातील स्त्रिया लग्नासाठी हमखास खरेदी करतात. त्याचे महत्त्व वर्षांनुवर्षे टिकून आहे. इतकेच नव्हे तर बनारसी शालूशिवाय लग्नच पार पडत नाही असे म्हटले तरी वावगे ठरू नये. उत्तर प्रदेशातील चंदौली, बनारस, जौनपूर, आजमगढ, मिर्जापूर आणि संत रविदासनगर या जिल्ह्यांतील विणकर या साडय़ा तयार करण्यात वाकब्गार आहेत. याला लागणारा कच्चा माल बनारस येथून येतो, त्यामुळे ही साडी सर्वदूर बनारसी साडी या नावाने ओळखली जाते. एके काळी बनारसची पूर्ण अर्थव्यवस्था या बनारसी साडीभोवती उभी होती.

मुख्यत्वे रेशमाचा वापर करून विणल्या जाणाऱ्या या साडीला जरीचा वापर करून विणलेले काठ आणि पदर असतात. पूर्वी जरीच्या निर्मितीमध्ये शुद्ध सोन्याचा आणि चांदीचा वापर केला जायचा. पण सोन्याचे व चांदीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे आता त्याची जागा कृत्रिम जरीने घेतली आहे, तरी साडी विणण्याचे काम सुरू आहे.

विविध प्रकारच्या नक्षीकामाचा वापर या साडीत केला जातो तर वेलबुट्टीचे नक्षीकाम काठात व पदरात वापरले जाते. याखेरीज या साडीवर रेशमाने किंवा जरीने भरतकामही केले जाते. भरतकामाची नक्षी नाजूक असते, त्यामुळे विणायला ती किचकट असते. या कारणाने साडी तयार व्हायला अधिक वेळ लागतो.

एका साडीला पंधरा ते तीस दिवस इतका वेळ लागतो. एखादी किचकट कलाकुसर असेल तर कधी कधी सहा महिनेही लागतात. या साडीची किंमत ती साडी विणायला किती वेळ लागला त्यानुसार वाढत जाते आणि ते रास्तच आहे. जरीचा वापर आणि भरतकाम यामुळे साडीचे वजनही वाढते. हाही एक घटक साडीची किंमत वाढायला कारणीभूत ठरतो.

या साडी उद्योगाने सुमारे बारा लाख लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. त्यामध्ये हातमागावर काम करणाऱ्या विणकरापासून ते पूर्वतयारी करणारे आणि भरतकाम करणारे असे सर्व कारागिर समाविष्ट आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.