पुणे –फर्ग्युसन टेकडी येथे पर्वत पूजन करून पर्वतांप्रती ऋण व्यक्त करत गिरिप्रेमी संस्थेकडून आंतरराष्ट्रीय पर्वतदिन साजरा करण्यात आला. यावेळी उपवनसंरक्षक राहुल पाटील, पर्यावरणतज्ञ डॉ. संजीव नलावडे, जीविधाचे संचालक राजीव पंडित, महाराष्ट्र राज्य वन्यजीव सल्लागार समितीच्या सदस्या अनुज खरे, प्रसिद्ध लेखक प्र. के. घाणेकर, गिरिप्रेमीच्या अध्यक्षा उषःप्रभा पागे), अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ व ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
2003 सालापासून संयुक्त राष्ट्रसंघामार्फत 11 डिसेंबर हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय पर्वतदिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी एक विशिष्ट विषय घेऊन हा दिवस साजरा होतो. यावर्षी पर्वत व तेथील जैवविविधता हा विषय नेमण्यात आला होता. त्यालाच अनुसरून विविध कार्यक्रम गिरिप्रेमी संस्थेने आयोजित केले होते.
संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीर केलेल्या 32 जैवविविध प्रदेशांपैकी अर्ध्याहून अधिक प्रदेश हे पर्वतांमध्ये आहेत. भारतातील पश्चिम घाट, ज्याचा सह्याद्री हा प्रमुख भाग आहे आणि हिमालय हे या 32 पैकी प्रमुख भाग आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागातील प्राध्यापक व गिर्यारोहक डॉ. अविनाश कांदेकर यांनी सह्याद्री पर्वत व येथील खडक यांविषयी रंजक माहिती सांगितली.
गिरिप्रेमी सदस्य व एव्हरेस्टवीर भूषण हर्षे यांनी आंतरराष्ट्रीय पर्वतदिनानिमित्त गिरिप्रेमी आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कांचनजुंगा शिखरवीर विवेक शिवदे यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण प्रस्ताररोहकांनी खाणीतील कातळकड्यांवर प्रात्यक्षिक सादर केले. या कार्यक्रमास गिरिप्रेमीचे विविध गिर्यारोहक व सदस्य उपस्थित होते.
कोव्हिड-19 संक्रमण संबंधी असणारे सर्व नियमांचे पालन करत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी दोन दिवसांपूर्वी पुण्यातील कोथरूड भागामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या गव्याला श्रद्धांजली वाहण्यात आली.