एक लाख ऑनलाइन प्रतिज्ञापत्रांचा संकल्प
चिंचवड – चिंचवड येथील कमला शिक्षण संकुलच्या वतीने गेल्या 10 वर्षांपासून प्रदूषणमुक्त दिवाळी सण साजरी करावी, यासाठी समाजप्रबोधन करीत आहे.
यंदा करोना संसर्गजन्य संकटाच्या पार्श्वभूमीवर कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा महाविद्यालयाचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरीया, लायन्स आंतरराष्ट्रीय संघटना (प्रांत 3234 डी 2) लायन्स क्लब ऑफ तळेगावच्या अध्यक्षा प्रमिला वाळुंज, अभय शास्त्री, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पिंपरी-चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे यांच्या वतीने अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
याबाबत बैठक घेण्यात आली असून या बैठकीत महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिकांकडून दिवाळी सणानिमित्त फटाके न उडविण्याचे प्रतिज्ञापत्र ऑनलाइन एक लाख गुगल फॉर्मद्वारे भरण्याचा संकल्प राबविण्यात येणार असल्याचे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा यांनी यावेळी सांगितले.
दिवाळी सणात फटाक्यांमुळे हवेत प्रदूषण होते, वातावरण दूषित होते. अनेक आजार, अपघात, भाजणे, आग लागणे असे प्रकार घडतात. काहीवेळा आपणच निमंत्रण देत असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावर्षी करोनाचे रुग्ण आता कमी प्रमाणात आढळत असले तरी येणाऱ्या थंडीमुळे अन्य देशात करोना रुग्ण वाढत आहेत. आपल्याकडे देखील थंडी वाढत आहे. आपण प्रत्येकाने सावधगिरी बाळगत फटाके विरहित साधेपणाने दिवाळी सण साजरी करावी. आपल्या श्वसन संस्थेचे प्रदूषण होणार नाही, याची प्रत्येक नागरिकांने दक्षता घेण्याची आज आवश्यकता आहे. शालेय मुला-मुलींचा उत्साह घरोघरी असला तरी पालक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी संकल्प केला, तर करोनाचा प्रादुर्भाव दूर ठेवता येईल.
प्रदूषणविरहीत सण साधेपणाने साजरी करता येईल. आज घरोघरी जवळपास प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. दिवाळी सणात फटाके न उडविण्याचे प्रतिज्ञापत्र ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही कल्पना अभिनव असून, प्रत्येकाने आपापल्या व्हॉट्सऍप ग्रुपमधून आपले, नातेवाईक, मित्रमंडळींना माहिती शेअर केली, तर जनजागृती होईल.
तसेच शहरातील स्वयंसेवी, सामाजिक, शैक्षणिक इतर संघटना, गृहसंकुलाचे पदाधिकारी यांना देखील फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, करोनाचा नायनाट करावा’ हा संदेश डॉ. दीपक शहा यांनी यावेळी दिला.