काय चाललंय साताऱ्यात…!

वाढदिवस का करायचा रस्त्यावर साजरा?
सातारा  –
आपल्या आयुष्यातील वाढत्या वर्षाचा एक दिवस आनंदात साजरा करणे कोणाला नाही आवडणार. आपल्या प्रेमाची, आपुलकीची भावना वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करण्याचा तो आनंद सोहळा असतो; पण आपण तो कसा साजरा करतो, त्याचा आज विचार करणे गरजेचे आहे. त्याचे कारण म्हणजे सातारा शहरात वाढदिवस रस्त्यावर साजरा करण्याचे प्रस्थ वाढत आहे.

चौकाचौकांमध्ये साजऱ्या होणाऱ्या अशा वाढदिवसांमुळे संबंधितांवर पोलिसांना कारवाई करावी लागत आहे. आनंद साजरा होत असताना अशी कारवाई करावी लागणे, ही शोकांतिका आहे. याबाबत आपण जबाबदार नागरिक म्हणून आत्मचिंतन करणार आहोत की नाही? रस्त्यावर वाढदिवस साजऱ्या करण्याच्या या प्रकारांना आळा घालणे आवश्‍यक आहे.

काही युवकांकडून वाढदिवसाचे होत असलेले हिडीस दर्शन, त्या दिवसाचे महत्त्व कमी करू पाहत आहेत की काय, असे वाटू लागले आहे. रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा करून, गाड्या आडव्या लावून, आरडाओरडा करत धारदार तलवारींनी केक कापण्यात काही युवकांना धन्यता वाटते. केक कापल्यानंतर तो वाटून खाण्यापेक्षा अंगाला, तोंडाला फासणे, ही आपली संस्कृती आहे का? भरीस भर म्हणजे,

रात्री 12 वाजता फटाक्‍यांच्या माळा लावून परिसरातील लोकांची झोपमोड करायचे आणि अमूक याचा वाढदिवस आहे, हे जाहीर करायची प्रवृत्ती फोफावत आहे. दिवाळी, विवाह सोहळ्यातील वरातीत, गणेशमूर्तींच्या मिरवणुकीत, देवीच्या मिरवणुकीत फटाके फोडायची आपली परंपरा आहे. एरवी निवडणुकीचा निकाल किंवा संपूर्ण जनतेला आनंद देणाऱ्या एखाद्या घटनेचा अपवाद वगळता, आपल्याकडे फटाक्‍यांची आतषबाजी केली जात नाही. कधी कधी एखादी अत्यंत महत्त्वाची क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर फटाके वाजवले जातात; पण वाढदिवसानिमित्त रात्री अपरात्री फटाके वाजवण्याची प्रथा कशासाठी, याचे कोडे उलगडत नाही.

महाविद्यालयांच्या परिसरात अशा पद्धतीन रस्त्यांवर वाढदिवस साजरे करायचे लोण वाढत आहे. नुकतेच कुठे मिसरूड फुटलेल्या भाई, बाबा, आप्पा, दादा, भाऊ, अण्णा आदींच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी लावले जातात. युवा नेते असा शब्दप्रयोग करून त्यांचा गौरव केला जातो. या बॅनरवर साताऱ्यातील दिग्गज नेत्यांचे फोटो छापले की, आपण विनापरवाना कुठेही बॅनर लावले तरी चालतील, असे या लोकांना वाटते. आपल्यासोबत चार शेंबडी पोरे घेत छाती फुगवून फिरायचे आणि उदयोन्मुख नेता म्हणून मिरवायचे प्रकारही हे दादा, बाबा, अण्णा लोक करत आहेत. या बॅनरवर फोटो असलेल्या अनेकांना आसपासच्या परिसरातील लोकही ओळखत नाहीत तरी त्यांचे विविध स्टाईलमधले फोटो, संदेशासह पाहावे लागतात.

वाढदिवसाचा आनंद आपली मित्रमंडळी, आप्तेष्टांसोबत साजरा करण्यात गैर काहीच नाही; पण हा जल्लोष रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी नको. आपल्यामुळे इतर कोणाला, विशेषत: ज्येष्ठ नागरिक, लहान बालकांना त्रास होतो, याची जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे. वाढदिवसाचे सोहळे इतरांना आनंद देणारे हवेत; पण ते कारवाईचे निमित्त व्हावेत, अशा प्रथा हव्यात कशाला?

सोशल मीडियावर पडणाऱ्या शुभेच्छांच्या आभासी पावसात भिजण्याचा आनंद क्षणिक असला तरी तो मनाला मोहरून टाकतो; परंतु वाढदिवसानिमित्त आपल्या जवळच्या लोकांना प्रत्यक्ष भेटण्याची मजा काही औरच आहे. चला तर मग, यापुढे विधायक पद्धतीने वाढदिवस साजरे करू या. गोंगाट, गोंधळ करण्यापेक्षा एखादे झाड लावून, आपल्या वाढत्या वयाचा विचार करून जपून साजरा करू या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.