पेशावर – पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातल्या कुर्रम जिल्ह्यात आदिवासींच्या दोन जमातींमधील संघर्षाबाबत आता नव्याने शस्त्रसंधी करण्यात आली आहे. दोन्ही जमातींमधील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असलेली महापंचायत कोहात जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती. तेथे सस्त्रसंधीबाबतचा निर्णय घेण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी प्रांतीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले.
हिंसाचारामुळे विस्थापित झालेल्या लोकांना पुन्हा घरी परत येता यावे, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. दरम्यान गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत मरण पावणाऱ्यांची संख्या १३३ झाली असून १७७ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
दिनांक २२ नोव्हेंबर रोजी वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ५७ ठार झाले होते. तेंव्हापासून अलिझाय आणि बागान या जमातींमध्ये सशस्त्र हिंसाचार उफाळला होता. या हिंसाचारामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागला होता. तसेच कारलाची सीमेवरून अफगाणिस्तानशी होणारा व्यापारही पुर्णपणे थांबला होता.