कैरो – इस्रायल आणि हमास अतिरेकी गट यांच्यातील युद्धबंदीसाठी आणि गाझा पट्टयातील उद्ध्वस्त क्षेत्राची फेरउभारणी करण्यासाठी इजिप्त आणि इस्त्रायल या दोन्ही देशांमध्ये रविवारी उच्चस्तरीय चर्चा झाली.
तब्बल 11 दिवसांच्या युद्धादरम्यान या भागाची मोठी हानी झाली आहे. इजिप्तचे परराष्ट्रमंत्री समीह शुक्री यांनी कैरो येथे इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गबी अश्कनाजी यांचे स्वागत केले.
ही बैठक इस्रायल-हमास युद्धबंदीच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. मात्र, चर्चा इस्रायल-हमासमध्ये पुन्हा सुरू कशी केली जाईल हे इजिप्तने स्पष्ट केले नाही.
शुक्री यांनी दोन्ही बाजूंमधील गंभीर आणि विधायक वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी वातावरण निर्माण करण्याची मागणी केली. शांतता चर्चेच्या प्रयत्नांना अडथळा आणू शकतील अशा कोणत्याही कृत्यांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी दोन्ही बाजूंना केले. हमासच्या ताब्यात असलेल्या इस्रायली सैनिक आणि नागरिकांच्या सुटकेविषयीही त्यांनी चर्चा केली असल्याचे इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
तर प्रादेशिक स्थिरतेला धोका निर्माण करणाऱ्या अतिरेकी गटांना बळकट करण्यापासून रोखण्यासाठी आणि हमासच्या ताब्यात घेतलेल्या बेपत्ता व्यक्ती आणि कैद्यांना घरी परत आणण्यासाठी आपण सर्वांनी कृती करण्याची गरज आहे, असे अश्कनाजी म्हणाले.
पॅलेस्टिनी प्राधिकरणाने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी कोर्टामध्ये आणि संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेमध्ये केलेल्या कारवाईबद्दल त्यांनी टीकाही केली. हमासबरोबर 2014 पासून इस्रायलने केलेल्या युद्धादरम्यान पॅलेस्टाईनच्या युद्ध अपराधांच्या तक्रारी दाखल झाल्याचा आरोप अश्कनाजी यांनी केला.