सातारा – राजवाडा बसस्थानकातील सीसीटीव्हीत तांत्रिक बिघड झाल्याने काही दिवस ते बंद अवस्थेत होते. आता मात्र हे सीसीटीव्ही पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशी समाधान मानत आहेत. यामुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसणार आहे.
राजवाडा बसस्थानकावरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवाशी ये-जा करतात. यामुळे येथे गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच प्रवाशांना बसण्यासाठी जी व्यवस्था करण्यात आली आहे. तिथून वस्तू चोरीला जाण्याची शक्यता होती. म्हणून या बसस्थानकावर सीसीटीव्ही कॉमेरे बसवण्यात आले होते.
सीसीटीव्ही बसवल्यानंतर त्यांचे काम काही दिवस सुरळीत सुरू होते. मात्र मध्यंतरी तांत्रिक कारणांमुळे यात बिघाड झाल्याने काही दिवस हे कॅमेरे बंद अवस्थेत हेते. याचा फायदा घेवून चोरीचे प्रमाण वाढले होते. याला आळा घालण्यासाठी हे कॅमेरे सुरू करण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. या मागणीची दखल एसटी महामंडळाने घेतली असून दोन दिवसांपासून हे सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू झाले आहेत. याचा फायदा प्रवाशांना होणार असून वस्तू चोरीला गेल्यास ती कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तत्काळ मिळणार आहे. तसेच चोरावरही करडी नजर राहणार असल्याने चोरीच्या घटनांना आळा बसणार आहे.