कराडच्या भाजीमंडईतील सीसीटिव्ही कॅमेरे बंद अवस्थेत

कराड – भाजी मंडईसारख्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न खूप महत्त्वाचा असतो. अशा ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्‍यता असते. याबाबतची माहिती तात्काळ मिळावी, त्या माध्यमातून नागरिकांची सुरक्षा व्हावी यासाठी कराड नगर पालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईच्या इमारतीत दोन सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

मात्र, हे कॅमेरे सध्या बंद पडले असून भाजी विक्रेत्यांसह नागरिकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून कराड पालिकेने 2011 मध्ये गुरूवार पेठ येथे शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. 196 गाळे असलेल्या इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्च करण्यात आले. दोन मजली इमारतीतील आतील आणि बाहेरील बाजूस 196 गाळे काढण्यात आले आहेत. सध्या या भाजी मंडईतील इमारतीतील बंद अवस्थेत असलेले अनेक गाळे लिलावाअभावी तसेच पडून राहिले आहेत.

अशी अवस्था पालिकेने बांधलेल्या नवीन भाजी मंडईतील इमारतींमधील गाळ्यांची आहे. अशात इमारतीतील आतील बाजूस कठड्यांवर बसून भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर व ग्राहकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये. घडल्यास त्याची तात्काळ माहिती मिळावी तसेच अज्ञात चोरट्यांकडून चोरीचा प्रकार केल्यास त्याचा पुरावा मिळावा म्हणून पालिकेच्यावतीने मंडईतील आतील बाजूस सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

सुरूवातीला ते सुरू होते सध्या मात्र, ते बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे भाजी मंडई परिसरात महिला, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजी मंडईसारख्या गर्दीच्या ठिकाणी नवीन सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. तसेच इमारतीच्या आतील बाजूस बंद असलेले सीसीटिव्ही कॅमेरे पालिकेने सुरू करावे, अशी भाजीविक्रेते व नागरिकांतून मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.