सीबीएसई दहावी परीक्षेचा निकाल 91.10 टक्के

देशातील 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण


गतवर्षीच्या तुलनेत यंदा 4.40 टक्‍क्‍यांनी वाढला निकाल


मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 2.31 टक्‍क्‍यांनी अधिक


महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल सर्वाधिक

पुणे – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई ) या बोर्डामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यावर्षी सीबीएसईचा दहावीचा निकाल 91.10 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा 2.31 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. देशातील 13 विद्यार्थ्यांनी परीक्षेत 500 पैकी 499 गुण घेऊन संयुक्तरीत्या अव्वल स्थान मिळविले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 4.40 टक्‍क्‍यांनी निकाल वाढला आहे.

सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 4 एप्रिलदरम्यान झाली. एकूण 17 लाख 61 हजार 78 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी 16 लाख 4 हजार 428 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त आहे. मुलांच्या उत्तीर्णांचे प्रमाण 90.14 टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णांचे प्रमाण 92.45 टक्‍के अधिक आहे. विभागानुसार तिरुवनंतपूरममध्ये सर्वाधिक 99.85 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्याखालोखाल महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा 99 टक्के निकाल लागला आहे. तब्बल 24 विद्यार्थ्यांनी 500 पैकी 498 गुण मिळविले आहेत.

यावर्षी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत एकूण 2 लाख 25 हजार 143 विद्यार्थ्यांनी 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. तर, 57 हजार 256 विद्यार्थ्यांनी 95 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहे. विशेष वर्ग आणि दिव्यांग वर्गातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 95.99 टक्के आहे. त्यामध्ये दिलवीन प्रिन्स याने 493 गुण मिळवून प्रथम क्रमांक, तर सावन विशोय याने 492 गुण मिळवून द्वितीय आणि आयरेने मॅथ्युज हिने 491 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे, असे सीबीएसई बोर्डाने सांगितले आहे.

एकूण शाळा – 19,298
परीक्षा केंद्र – 4,974
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी – 16,04,428
उत्तीर्णांचे प्रमाण 91.10 टक्के

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.