टीआरपी फेरफार प्रकरणाचा सीबीआय करणार तपास

उत्तरप्रदेश सरकारच्या शिफारसीवरून पाऊल

नवी दिल्ली – टीव्ही जगताला हादरवणाऱ्या टेलिव्हिजन रेटिंग पॉईंटस्‌ (टीआरपी) फेरफार प्रकरणाचा तपास सीबीआयने हाती घेतला आहे. उत्तरप्रदेश सरकारच्या शिफारसीवरून सीबीआयने ते पाऊल उचलले आहे.

टीआरपीमध्ये फेरफार करणारे रॅकेट सर्वप्रथम मुंबई पोलिसांनी चव्हाट्यावर आणले. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामुळे काही टीव्ही वाहिन्या संशयाच्या घेऱ्यात सापडल्या आहेत. अशातच उत्तरप्रदेश पोलिसांनी लखनौमध्ये टीआरपी फेरफाराबद्दल एक गुन्हा दाखल केला. एका जाहिरात कंपनीच्या प्रवर्तकाने दिलेल्या तक्रारीवरून ती कारवाई करण्यात आली.

त्यानंतर उत्तरप्रदेश सरकारने संबंधित प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस केली. सीबीआयने तातडीने हालचाली करत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला. मात्र, त्याविषयीचा अधिक तपशील तातडीने मिळू शकला नाही. मुंबई पोलिसांनी रॅकेट उघडकीस आणल्यानंतर रेटिंग एजन्सी असणाऱ्या ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काऊन्सिलने काही काळासाठी रेटिंगला स्थगिती दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.