हाथरस – उत्तरप्रदेशातील हाथरस येथील दलित मुलीवर चार जणांनी सामुहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याची बाब सीबीआय चौकशीत निष्पन्न झाली असून या प्रकरणात संबंधीत चार जणांच्या विरोधात सीबीआयने आज आरोपपत्र दाखल केले आहे.
त्यांच्या विरोधात अनुसुचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखालीही खटला दाखल करण्यात आला आहे. हाथरस येथील कोर्टातच सीबीआयने हे आरोपपत्र दाखल केले आहे.
14 सप्टेंबर रोजी दलित समाजातील या 20 वर्षीय मुलीवर उच्चजातीतील चार जणांनी सामुहिक बलात्कार करून तिची हत्या केली होती. या प्रकरणाचे पडसाद संपुर्ण देशभर उमटले होते. राजकीय वर्तुळातही हे प्रकरण चांगलेच तापले होते.
उत्तरप्रदेश पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारीने हाताळले होते. आणि या मुलीचा अंत्यविधी मध्यरात्री आई वडिलांच्या अनुपस्थितीतच उरकण्यात आला होता. त्यामुळेही या प्रकरणी संतापजनक प्रतिक्रीया उमटली होती.
या प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयने आणखी काहीं कालावधी मिळावा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. त्यानुसार कोर्टाने त्यांना आणखी वेळ दिला असून याची पुढील सुनावणी आता जानेवारी महिन्यात होणार आहे.