देशातील सर्वांत मोठा बॅंक घोटाळा उघड; नीरव मोदी-चोक्‍सीलाही टाकले मागे

नवी दिल्ली – सीबीआयने सुमारे 8 हजार कोटी रूपयांच्या बॅंक घोटाळ्याबद्दल हैदराबादस्थित कंपनी आणि तिच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणाकडे देशातील आजवरचा सर्वांत मोठा बॅंक घोटाळा म्हणून पाहिले जात आहे. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांनी केलेल्या घोटाळ्यांमधील रक्कमही त्यामुळे मागे पडली आहे.

हैदराबादमधील ट्रांसस्ट्रॉय(इंडिया)लि. ही कंपनी सीबीआयच्या रडारवर आली आहे. त्या कंपनीने कॅनरा बॅंक आणि इतर काही बॅंकांना मिळून तब्बल 7 हजार 926 कोटी रूपयांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. त्यावरून सीबीआयने कंपनीबरोबरच अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चेरूकुरी श्रीधर तसेच रायापती संबाशिव राव आणि अक्किनेनी सतीश यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

कारवाईचे पुढील पाऊल उचलताना सीबीआयने कंपनी आणि तिच्या संचालकांशी संबंधित ठिकाणी छापेही टाकले. त्या छाप्यांवेळी काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. क्रेडिट सुविधांचा गैरवापर करून संबंधित कंपनीने बॅंकांची फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. त्या कंपनीच्या घोटाळ्याशी निगडीत रकमेने चोक्‍सी आणि नीरव मोदी यांनी केलेल्या अपहाराला मागे टाकले आहे. विविध बॅंकांना नीरव मोदीने 6 हजार कोटी रूपयांचा, तर चोक्‍सीने 7 हजार 80 कोटी रूपयांचा गंडा घातला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.