मुंबई : IPS भाग्यश्री नवटाके यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावमधील बीएचआर राज्य सहकारी पथसंस्थेच्या घोटाळा प्रकरणाच्या तपासात अनियमितता असल्याच्या आरोपावरून आयपीएस भाग्यश्री नवटाके यांच्याविरुद्ध सीबीआयने हा गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
भाग्यश्री नवटाके आर्थिक गुन्हे शाखेच्या डीसीपी म्हणून कार्यरत असताना जळगावमधील भाईचंद हिराचंद रायसोनी राज्य सहकारी पतसंस्थेत 1200 कोटींचा घोटाळा झाला होता. 2015 मध्ये बीएचआर घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात फिक्स डिपॉझिटवर आकर्षक व्याजाचं आश्वासन देण्यात आलं होतं. यानंतर बँकेकडून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली होती.
या घोटाळ्याचा तपास भाग्यश्री नवटाके यांनी केला होता. या तपासात अनियमितता असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने ऑगस्ट 2024 मध्ये या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस केली होती. सीबीआयने आता याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. आयपीएस भाग्यश्री नवटाके या सध्या चंद्रपूरमध्ये राज्य राखीव पोलीस दलात अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.