कोलकाता – जनावरांच्या तस्करीच्या प्रकरणातील तपासासाठी तृणमूल युवा कॉंग्रेसच्या नेत्याच्या दोन मालमत्तांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने छापे टाकले. विनय मिश्रा असे या नेत्याचे नाव आहे.
कोलकात्याच्या लेक टाऊन आणि रासबिहारी भागात सीबीआयच्या किमान 10 अधिकाऱ्यांचे पथक न्यायलयाचे सर्च वॉरंट घेऊन दाखल झाले. तृणमूल युवा कॉंग्रेसचे सरचिटणीस कुमार मिश्रा यांच्यावर लूक आऊट नोटीसही सोबत आणली असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. सीबीआयच्या तपासात त्यांचे नाव अनेकदा आल्याचे समजते. मिश्रा सापडत नसल्याने सर्व विमानतळांना त्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्याचे या प्रकरणात प्रथमच नाव घेतले आहे. पश्चिम बंगाल – बांगलादेश सीमेवरून जनावरांच्या बेकायदा व्यापाराबाबत सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी सतीश कुमार यांच्यासह तीन अज्ञात व्यक्ती आणि अज्ञात सरकारी कर्मचारी यांच्यावर सप्टेंबर महिन्यात सीबीआयने गुन्हा नोंदवला होता. कुमार यांना 17 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती.
सरकारने पकडलेली जनावरे विकत घेण्यासाठी निवडक व्यापाऱ्यांनाच परवानगी देण्यात येत असे. अत्यंत किरकोळ किंमतीला ही जनावरे विकत घेऊन त्यांची बांगलादेशला तस्करी केली जात असे. तपासात सीमा सुरक्षा दल, अबकारी खात्याचे अधिकारी आणि इनामल हक सारखे व्यापारी यांच्यात निकटचे संबंध असल्याचे आढळून अलो.
जप्त केलेल्या जनावरांची प्रजात आणि वजन कमी दाखवले जात असे. त्यामुळे ही जनावरे कमी किंमतीला विकता येत असत. मुर्शिदाबादमधील अबकारी खात्याच्या कार्यालयात 24 तासात त्याची विक्री होत असे, असे सीबीआयने म्हटले आहे.