नवी दिल्ली – सीबीआयने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे बंधु अग्रसेन गेहलोत आणि इतर 14 जणांविरुद्ध कथित खतांच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांच्या घरावर छापा घातला. या प्रकरणात अन्य 16 जणांच्याही घराची झडती घेण्यात आली आहे.
सीबीआयच्या 60 हून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी गुजरात, राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील 17 हून अधिक ठिकाणी छापे घातले. या अधिकाऱ्यांचे एक पथक मुख्यमंत्र्यांचे बंधु अग्रसेन गेहलोत यांच्या जोधपुर जिल्ह्यातील मंडोर येथील निवासस्थानी गेले होते.
हे प्रकरण पोटॅशियम क्लोराईड म्हणून ओळखले जाणारे म्युरिएट ऑफ पोटॅश (एमओपी) च्या आयातीतील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित आहे, जे सरकारने देऊ केलेल्या सुमारे 80 टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना वितरित केले जाणार होते, असे सीबीआयने म्हटले आहे.हे खत आयात करून त्याचे रिपॅकिंग करून विदेशी बाजारपेठांमध्ये निर्यात केले गेले असा सीबीआयचा आरोप आहे.