नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या घरांवर सीबीआयने धाडसत्र सुरु केले आहे. मुंबई, दिल्ली आणि तामिळनाडूमधल्या सात ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे. 2010 ते 2014 कालावधीत पैशांची बेकायदेशीर मार्गाने देवाणघेवाण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित प्रकरणातून सीबीआयने पी. चिदंबरम यांच्या सात मालमत्तांवर छापे टाकले आहेत. मुंबई, दिल्ली , चेन्नई आणि तामिळनाडूमधील सिवगंगई या चार शहरात या मालमत्ता आहेत. 2010 ते 2014 या कालावधीत कार्ती चिदंबरम यांनी पैशांची बेकायदेशीर मार्गाने देवाणघेवाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने आता कार्ती यांच्याशी संबंधित पी. चिदंबरम यांच्या मालमत्तांवर छापे टाकले असल्याचे सांगण्यात येत आहे.
सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्ती चिदंबरम आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध विविध फौजदारी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरुन व्हिजा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे. तसेच, या व्हिजाच्या बदल्यात 50 लाख रुपये घेतल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यावेळी त्यांचे वडील पी. चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री होते. 2011 सालची ही घटना आहे.
I have lost count, how many times has it been? Must be a record.
— Karti P Chidambaram (@KartiPC) May 17, 2022
दरम्यान, सीबीआयच्या छापेमारीनंतर कार्ती चिदंबरम यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितले आहे की, “आतापर्यंत ही छापेमारी किती वेळा झाली, हे मोजायला मी विसरलोय. नक्कीच हा एक विक्रम असेल.”