नवी दिल्ली – येस बॅंक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयने आज दिल्ली आणि राजधानीच्या परिसरातील काही ठिकाणी छापे घातले.
गौतम थापर, अवंथा रिऍल्टी आणि अन्ट काहीजणांच्या विरोधात येस बॅंकेत 2017 ते 2019 दरम्यान 466 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचलले आहे. येस बॅंकेतील सार्वजनिक निधीचा अपहार केल्याच्या आणखी एका प्रकरणी थापर यांची स्वतंत्रपणे चैकशी सुरू आहे. याप्रकरणात येस बॅंकेचे अध्यक्ष राणा कपूर यांचाही समावेश आहे.
सध्याच्या प्रकरणात सीबीआयने रघुबीर कुमार शर्मा, राजेंद्रकुमार मंगल, तापसी महाजन, त्यांच्या कंपन्या ऑयस्टर बिल्डवेल प्रायव्हेट लिमिटेड, अवंता रियल्टी प्रायव्हेट लिमिटेड आणि झाबुआ पॉवर लि. यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
27 मे 2021 रोजी बॅंकेचे मुख्य दक्षता अधिकारी आशिष विनोद जोशी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 466.15 कोटी रुपयांच्या सार्वजनिक पैशांचे फेरफार करण्यासाठी फौजदारी कट, विश्वासाचा भंग, फसवणूक आणि बनावटगिरीचे काम केले आहे, असा आरोप सीबीआयने केला आहे.
गुन्हा नोंदवल्यानंतर सीबीआयच्या पथकाने आरोपींच्या जागेसह दिल्ली आणि एनसीआरमधील किमान 15 ठिकाणी शोध घेतला.