मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलेल्या अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने आज गुन्हा दाखल केला आहे. सिंह यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, विविध ठिकाणांची झाडाझडती घेण्यास सीबीआयने सुरुवात केली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता अनिल देशमुख यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अनिल देशमुखा यांना अटक करण्याची मागणी याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, देशमुख यांच्या विरोधात सबळ पुरावे सीबीआयकडे असल्याने त्यांना अटक झाली पाहिले. पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने देशमुख यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.
जयश्री पाटील पुढे म्हणाल्या की, मी आधीच सांगितले होते अनिल देशमुख ही मुघलाई नाही, तुम्ही भ्रष्टाचार करून देशाला लूटू शकत नाही. कारण हे संविधानाचे, भारतीय कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे तुम्ही केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. सीबीआयला दिलेल्या पुराव्याबाबत बोलताना पाटील म्हणाल्या, मलबार हिल पोलीस स्थानकात दाखल केलेल्या गुन्ह्याची कॉपी सीबीआयला दिली तसेच सीबीआयला आवश्यक मदत, पुरावे सादर केले. अनिल देशमुखांमुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांचेही पुरावे सीबीआयला दिले आहेत. त्यामुळे सीबीआयने आज गुन्हा दाखल करत देशमुखांच्या घरासह १० विविध ठिकाणी सीबीआय छापेमारी केल्याचं त्यांनी नमूद केलं.