‘पूजा चव्हाण मृत्यूची सीबीआय चौकशी करा’

पिंपरी – पूजा चव्हाण या 23 वर्षीय तरुणीच्या मृत्यूची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे. पिंपरी-चिंचवडच्या अपर तहसीलदारांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

मूळची बीड जिल्ह्यातील असलेल्या पूजा चव्हाण या 23 वर्षीय तरुणीने वानवडी पुणे येथील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना संशयास्पद व घातपाती असल्याचे दिसून येत आहे. या घटनेत महाविकास आघाडी सरकारमधील काही बड्या नेत्यांचा सहभाग असल्याची ऑडिओ क्‍लिप देखील समोर आली आहे.

परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकारमधील काही बडे नेते या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे संबंधित तरुणीच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. तसेच या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत चौकशी करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याबाबतही ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

या वेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा लता रोकडे, महासचिव सुधा रायन, गौरी शेलार, उपाध्यक्ष निर्मला कांबळे, कोषाध्यक्षा शारदा बनसोडे आदी पदाधिकरी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.