ठुबे, कोतकर कुटुंबाची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
नगर – केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात तपासामध्ये दिरंगाई होत असून, या घटनेचा तपास सीबीआयकडे द्यावा. व इतर आरोपींना त्वरित अटक करावी. अशी मागणी अनिता ठुबे, सुनीता कोतकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, खासदार सदाशिव लोखंडे, उप जिल्हाप्रमुख गिरीश जाधव, नगरसेवक योगीराज गाडे, संग्राम कोतकर, प्रमोद दुबे, मदन आढाव आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेचे संजय कोतकर व वसंत ठुबे या दोन पदाधिकाऱ्यांची हत्या झाली. त्याचा तपास अतिशय संथ गतीने सुरू असून, त्यातील फरार आरोपींना अद्याप पर्यंत अटक झालेली नाही. या गुन्ह्याचा तपास गेली एक वर्षापासून सीआयडी पुणे करीत आहेत. त्यांनी आजपर्यंत एकाही फरार आरोपीला अटक केलेला नाही.
या गुन्ह्यात मुख्य आरोपी आमदार शिवाजी कर्डिले यांची मुलगी सुवर्णा कोतकर ही असून, आ. कर्डिले यांच्या घरी राहत आहे. तिला अद्याप पर्यंत अटक केली नाही. तसेच दर शनिवारी दर्शनाला शनिशिंगणापूर येथे दर्शनाला जात असते.
या बाबत सीआयडी यांना लेखी व तोंडी माहिती देऊनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही.त्याचप्रमाणे देवस्थानचे सीसीटीव्ही फुटेज तपास अधिकाऱ्यांनी तपासून पाहिले नाहीत. ते तपासले असते तर आरोपी सापडले असते. तपासी अधिकारी जाणीवपूर्वक फरार आरोपींना अटक करत नसून, त्यांना मदत करतात, मुख्य फरारी आरोपी अटक झाल्यास या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार कोण आहे. हे तपासातून उघड होईल. या गुन्ह्याचा तपास सीआयडी, पुणे यांच्याकडून काढून तो सीबीआय किंवा स्पेशल अन्वेषण पथक यांच्याकडे देण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच खून खटला हा न्यायालय सरकारची बाजू मांडण्यासाठी व आरोपींना शिक्षा होण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम किंवा त्या दर्जाचा अभिव्यक्तीची नियुक्ती करावी.
केडगाव येथील गुन्ह्याच्या तपासात अनेक त्रुटी दिसून येत असून, गुन्ह्यातील मुख्य आरोपी आमदार शिवाजी कर्डिले यांचे बरुहानगर येथील घर, व आमदार संग्राम जगताप यांचे आयुर्वेदिक कॉलेज येथील कार्यालय, त्याचप्रमाणे राजश्री हॉटेल तसेच भानुदास कोतकर यांची केडगाव येथील घर या मधील सर्व ठिकाणचे घटनेनंतर सीसीटीव्ही फुटेजचे डीव्हीआर नष्ट करण्यात आला असल्याचा ठुबे व कोतकर यांनी केले आहे.