सिद्धरामैय्यांचे येडियुरप्पांना आव्हान
बंगलुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जेडीएस-कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात करण्यात आलेल्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाच्या सीबीआय चौकशीचा आदेश दिला आहे. त्यावर कॉंग्रेसचे नेते सिद्धरामैय्या यांनी संतप्त प्रतिक्रीया दिली असून त्यांनी म्हटले आहे की, धमक असेल तर आता येडियुरप्पा यांनी आघाडीचे सरकार पाडण्याच्यावेळी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन कमलचीही सीबीआय चौकशी करावी.
आपल्या ट्विटरवर त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यातून नेमके तथ्य बाहेर येईल असेही ते म्हणाले. पण त्याच वेळी आघाडीचे आमदार फोडण्यासाठी भाजपने जे ऑपरेशन राबवले त्याचीहीं चौकशी केली पाहिजे असे ते म्हणाले.
सीबीआय भाजपचा पोपट झाला असून आपल्या राजकीय द्वेषासाठी त्यांनी या संघटनेची यंत्रणा या आधीही वारंवार वापरली आहे अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.