Polygraph Test: कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या हत्येचे प्रकरण जोर धरत आहे. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थीच्या बलात्कार आणि हत्येचा आरोप असलेल्या संजय रॉयची पॉलीग्राफ चाचणी घेण्यास कोलकाता न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिली आहे.
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या भीषण बलात्कार आणि हत्येचा चार वेगवेगळ्या कोनातून तपास करत आहे. आता सीबीआय ही चाचणी लवकरात लवकर करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चाचणी उद्याही होऊ शकते.
पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे काय?
पॉलिग्राफ टेस्ट म्हणजे खोटं पकडण्याची चाचणी, ही विज्ञानात लावण्यात आलेल्या अनेक रंजक शोधांपैकी एक आहे. यात एखादा माणूस खोटं बोलत असला की त्याच्या शारीरिक क्रियांमध्ये किंचित बदल होतात, हेच बदल टिपून तो खरं बोलतोय की खोटं हे ठरवलं जातं. मात्र या चाचणीमध्ये आरोपीने सांगितलेल्या गोष्टी कितपत सत्य आहे, हे सांगणं कठीण आहे. पॉलिग्राफ टेस्टचा सर्वात पहिला वापर 1921 साली अमेरिकेत करण्यात आला होता.
पॉलिग्राफ टेस्ट कशी केली जाते?
पॉलीग्राफ चाचणी दरम्यान, मशीनचे चार किंवा सहा पॉइंट व्यक्तीच्या छातीवर आणि बोटांना जोडलेले असतात. व्यक्तीला आधी काही सामान्य प्रश्न विचारले जातात. यानंतर त्याला गुन्ह्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. यादरम्यान मशिनच्या स्क्रीनवर मानवी हृदयाचे ठोके, रक्तदाब, नाडी यांचं निरीक्षण केले जाते. चाचणीपूर्वीही व्यक्तीची वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर त्याचे हृदयाचे सामान्य ठोके, रक्तदाब, नाडीचे प्रमाण इत्यादी नोंदवले जातात.
पॉलिग्राफ टेस्ट करण्याआधी काही सामान्य प्रश्न विचारून, त्याला आरोपी कशाप्रकारे प्रतिसाद देतोय हे पाहिलं जातं. या प्रश्नांची उत्तरं, तपासणी करणाऱ्यांना ठाऊक असतात. त्यामुळे या उत्तरादरम्यान होणारे शारीरिक बदल पाया म्हणून वापरण्यात येतात. त्यानंतर ज्या घटनांविषयी पोलिसांना शंका असते की आरोपी खोटं बोलतोय, त्याविषयीचे प्रश्न विचारण्यात येतात. त्यानंतर झालेले बदल टिपण्यात येतात. मग आधी विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांशी त्याची तुलना केली जाते.