नवी दिल्ली : कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि खून प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय याच्याविरुद्ध सीबीआयने आज आरोपपत्र दाखल केले आहे. संजय रॉयने पीडितेवर बलात्कार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली, असा उल्लेख या चार्जशीटमध्ये करण्यात आला आहे. तसेच पीडितेवर सामूहिक बलात्कार झाला नसल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
कोलकाता येथील आर. जी. कर रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टर म्हणून काम करणारी एक डॉक्टर ८ ऑगस्टच्या रात्री उशिरा तिची शिफ्ट संपल्यानंतर आराम करण्यासाठी सेमिनार हॉलमध्ये गेली होती. ९ ऑगस्टला सकाळी तिचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये आढळून आला. या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तेव्हा तिच्यावर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले. तिच्या शरीरावर 25 जखमा होत्या.
संजय रॉयनेच या डॉक्टरवर आधी बलात्कार केला आणि त्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या केली. तिच्या मृतदेहाची विटंबना केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय रॉय सेमिनार हॉलमध्ये गेला होता आणि नंतर पहाटे ४.३० च्या सुमारास बाहेर आला हे स्पष्ट दिसत आहे. कोलकाता पोलिसांना घटनास्थळी संजय रॉयचा ब्लू टूथ हेडफोन मिळाला.
पीडितेच्या नखांमध्ये आणि त्वचेवर जे रक्त आढळलं त्या रक्तातही संजय रॉयचा डीएनए होता. त्यामुळे संजय रॉयनेच डॉक्टरवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली हे स्पष्ट झाले. आता या प्रकरणात सीबीआयने जे आरोपपत्र दाखल केले आहे त्यात संजय रॉय यानेच बलात्कार करुन तिची हत्या केली ही बाब नमूद करण्यात आली आहे.