नवी दिल्ली – सीबीआयने आज इंडियन ओव्हरसिज बॅंकेच्या आंध्र प्रदेशातील सहा अधिकाऱ्यांवर बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. हे अधिकारी विजयवाडा आणि गुंटुर जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याकडे सुमारे साडेचार कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे.
त्यांच्या काही मालमत्ता तामिळनाडू येथेही असल्याचे निदर्शनाला आले असून सीबीआयने तेथेही छापेमारी केली आहे. या अधिकाऱ्यांची बॅंक खाती सीबीआयने गोठवली आहेत. या अधिकाऱ्यांनी आपली जादाची मिळकत एकाचा खात्यावर वळवून तेथून ती नियमित स्वरूपात काढून घेतल्याचे या खात्याच्या तपासणीनंतर आढळून आले आहे.
अशा पद्धतीने त्यांनी सुमारे चार कोटी 56 लाख रुपये परस्पर वळवले असल्याचे निदर्शनाला आले आहे. या अधिकाऱ्यांच्या अन्य मालमत्तांचाही शोध घेतला जात आहे.