सीबीआयकडून टीएमसीच्या दोन नेत्यांना अटक; ममता बॅनर्जीं म्हणाल्या,”हिंमत असेल तर मलाही अटक करा”

कोलकाता: नारदा स्टिंग ऑपरेशन प्रकरणी सीबीआयने आजतृणमूल काँग्रेसच्या मंत्री आणि आमदारांच्या घरी छापेमारी केली. त्यानंतर एका मंत्र्यासह दोन आमदार आणि एका नेत्याला अशा चौघा जणांना अटक केली. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राग अनावर झाला असल्याचे सांगण्यात येत  आहे. “आमच्या नेत्या आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे. त्यामुळे हिंमत असेल तर मलाही अटक करा”, असे आव्हानच ममता बॅनर्जी यांनी  दिले आहे.

घोटाळा प्रकरणी ही अटक करण्यात आली असून  मंत्री, आमदारांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी यांनी थेट सीबीआयलाच आव्हान दिले आहे. हिंमत असेल तर मलाही अटक करून दाखवा, असा  इशारा बॅनर्जी यांनी दिला आहे. टीएमसीचे नेते आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आले आहे. त्यामुळे मलाही अटक करा, असं त्या म्हणाल्या आहेत.

नेत्यांच्या अटकेनंतर ममता बॅनर्जी या सीबीआय कार्यालय असलेल्या निजाम पॅलेसमध्ये पोहोचल्या आहेत. मंत्र्यांना आणि नेत्यांना अटक करताना कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी या निजाम पॅलेसमध्ये गेल्या असून 14व्या मजल्यावर सीबीआयशी चर्चा करत आहे.

कोणत्या आधारावर नेत्यांना अटक करण्यात आली याचा जाब विचारण्यासाठी त्या इथे आल्या आहेत. कोर्टाची परवानगी न घेता आणि विधानसभा अध्यक्षांची परवानगी न घेता या नेत्यांना अटक करण्यात आल्याने त्यावरून ममता बॅनर्जी सीबीआय अधिकाऱ्यांना सवाल करत असल्याचं टीएमएसीचे नेते अनिंद राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज सकाळी सीबीआयची एक टीम परिवहन मंत्री आणि कोलकाता पालिकेचे अध्यक्ष फिरहाद हकीम यांच्या घरी पोहोचली. त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर त्यांना अटक करून सीबीआय आपल्यासोबत घेऊन गेली आहे. यावेळी हकीम यांनी मला नारदा घोटाळ्यात कोणत्याही नोटीशीशिवाय अटक केली जात असल्याचा दावा केला आहे. या घटनेची माहिती मिळताच टीएमसी कार्यकर्त्यांनी हकीम यांच्या घरासमोर गर्दी केली असून सीबीआय विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.