नवी दिल्ली : जीएसटीचे उपायुक्त दीपक पंडित यांच्यावर लाच घेतल्याचा आणि बेकायदा मालमत्ता जमवल्याचा गुन्हा सीबीआयने नोंदवला. त्यांची पत्नी आणि दोन मुलांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांचे दीपक हे बंधू होत. ते भूवनेश्वर येथे कार्यरत होते.
सीबीआयने त्यांच्या भूवनेश्वरमधील एका आणि मुंबईतील सहा ठिकाणी छापे टाकले. मुंबईत त्यांचे दहा फ्लॅट आणि दुकाने, मुदत ठेवी, म्यच्युअल फंड यांच्या 99 पावत्या जप्त केल्या आहेत. दीपक पंडीत आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे असणाऱ्या दहा बॅंक अकाउंटची तपासणी अद्याप सुरू आहे.
दीपक पंडित यांच्यावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी अप्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळाने त्यांच्यावर बेकायदा संपत्ती बाळगल्याच गुन्हा नोंदवला होता. आपल्या व्यक्तीगत लाभासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत असल्याची निनावी तक्रार आल्यानंतर त्यांची चौकशी सुरू झाली.
पंडीत यांच्या बेकायदा संपत्तीमध्ये महत्वाच्या ठिकाणी असणाऱ्या सदनिकांचा समावेश आहे. त्यांनी सर्वाधिक काळ मुंबई विमानतळावर एआयआर इंटेलिजन्समध्ये केले आहे.