सॅनिटायजर स्प्रे वापरताय ‘सावधान’

स्प्रेमुळे डोळ्यांना धोका : नागरिकांची स्प्रेलाच मागणी

पिंपरी – जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार द्रव स्वरुपातील सॅनिटायजर वापरले तर करोनाचा विषाणू नष्ट होण्यास मदत होते. मात्र स्प्रेचा अतिवापर केल्यास सॅनिटायजर हातावरून लगेच हवेत उडते आणि त्वचा कोरडी पडते. याशिवाय स्प्रेमधील कण नाकात-डोळ्यात गेल्यास त्यातील तीव्र अल्कोहोलमुळे त्रास होण्याची देखील शक्‍यता वर्तविण्यात येते. त्यामुळे अशा सॅनिटायजर स्प्रेचा वापर करीत असाल तर सावध रहा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सगळीकडेच करोना विषाणूचे संक्रमण वाढले आहे. त्यामुळे करोनापासून दूर राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. त्यासाठी मास्क, सॅनिटायजरचा वापर केला जात आहे. विविध प्रकारचे सॅनिटायजर वापरले जात आहे. त्यामध्ये द्रव स्वरुपातील व स्प्रेमध्ये असलेल्या सॅनिटायजरचा वापर जास्त करण्याकडे नागरिकांचा कल आहे. कामाच्या ठिकाणी खुर्ची, टेबल व इतर साधानांवर स्प्रे फवारला तर हरकत नाही. मात्र हातावर तसेच शरीरावर स्प्रे फवारणे धोक्‍याचे असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे.

बाजारामध्ये अनेक स्प्रे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या गुणवत्तेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ज्या कंपन्या हे सॅनिटायजर स्प्रे बनवताय त्या सर्टिफायड आहेत की नाही हे तपासण्यासाठी कोणतीही प्रणाली नाही. त्यामुळे सॅनिटायजर स्प्रे वापरत असाल तर खबरदारी नक्की घ्या…

स्प्रेमुळे शरीरावर होणारे परिणाम
– डोकेदुखी होणे
– हाताचे सालटे जाणे
– विविध फ्लेवरमुळे गरगर होणे
– नाकातून थेट मेंदूला धोका
– डोळ्यांची जळजळ होणे, लहान मुलांच्या डोळ्यांना अपाय होण्याची शक्‍यता

करोना विषाणूपासून वाचण्यासाठी सॅनिटायजर वापरणे आवश्‍यक आहे. मात्र त्याचा जास्त वापर करू नये. सॅनिटायजर घेताना ते सर्टिफाइड कंपनीचे घ्यावे. त्यामधील कन्टेंट व्यवस्थित वाचून घ्यावा. त्यामध्ये 70 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असले पाहिजे. त्यामुळे सॅनिटायजर घेताना चांगल्या दर्जाचे घ्यावे. असे सॅनिटायजर हातावरील विषाणू त्वरित मारतात. वारंवार सॅनिटायजरचा वापर करु नये. सॅनिटायजर वापरताना ते डोळ्यामध्ये जाता कामा नये.
-डॉ. सुनील जॉन, त्वचारोग तज्ज्ञ, तालेरा रुग्णालय.


सॅनिटायजरमध्ये अल्कोहलचे प्रमाण असते. त्यामुळे डोळ्यांना अपाय होण्याची शक्‍यता जास्त असते. सॅनिटायजर स्प्रेच्या अतिवापरामुळे डोळ्यांची जळजळ होते. डोळे लाल होतात. तसेच सातत्याने डोळ्यांची आग होत राहते. सॅनिटायजरमुळे डोळ्यामध्ये असलेल्या बुबुळाला जखम होण्याची शक्‍यता असते. विशेषतः लहान मुलांना यापासून जास्त धोका असतो. त्यामुळे सॅनिटायजरचा वापर जपून करावा. तसेच स्प्रेऐवजी साबणाने हात स्वच्छ धुण्यावर जास्त भर द्यावा.
-डॉ. अभिजीत अंग्रे, नेत्र रोगतज्ज्ञ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.