युद्धपातळीवर खबरदारी; करोना तपासणीसाठी 5 पथके

विभागीय आयुक्‍तांची माहिती

पुणे – करोना विषाणूचा प्रसार इतर विषाणूंच्या तुलनेत अधिक होत असल्याने खबरदारी गरजेची आहे, असे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले. दरम्यान, पुण्यात करोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्‍तींची तपासणी करण्यासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी पथके स्थापली असून त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलीस आणि दोन्ही महानगरपालिकांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय जिल्हा शल्य चिकीत्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार अंगणवाडी सेविका आणि आशाताई यांचा समावेश असलेल्या पथकांचीही निर्मिती करण्यात येणार आहे. या पथकाद्वारे हे दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी करोनाबाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, “करोना हा आजार योग्य खबरदारी व वेळीच उपचार केल्यास बरा होऊ शकतो. त्यामुळे तपासणी पथकातील व्यक्‍ती तसेच नागरिकांनी घाबरू नये. करोनाचा प्रसार वेळीच रोखण्यासाठी विभागीय आयुक्‍तांनी सोमवारी चार तास, तसेच मंगळवारी तीन तास सर्व संबंधितांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले आहे.’

माहिती राहणार गोपनीय
करोनाच्या तपासणीसाठी ज्या व्यक्‍तींना संपर्क करणार असाल, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखणे, ताप, खोकला येत आहे का, तसेच गेल्या महिनाभरात परदेशात जाऊन आले किंवा परदेशात जाऊन आलेल्या व्यक्‍तींच्या संपर्कात आले आहे का, याबाबत तपासणी करावी.

दरम्यान, ज्या व्यक्‍तींची तपासणी करणार असाल त्यांची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्याच्या सक्‍त सूचना आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी यावेळी दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.