- शहरातील एकूण मृत्यूच्या 53 टक्के मृत्यू अवघ्या तेरा दिवसांत
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. जुलै महिन्याच्या तेरा दिवसांत शहरात 86 मृत्यू झाले आहेत. म्हणजेच शहरातील आजपर्यंतच्या एकूण मृत्यूच्या 53 टक्के मृत्यू हे अवघ्या तेरा दिवसांत झाले आहे.
शहरात मार्च महिन्यामध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यामध्ये परदेशातून आलेल्या नागरिकांचा समावेश होता. शहरात पहिल्या टप्प्यात चौदा रुग्णांना करोनाची लागण झाली. ते बारा रुग्ण बरे झाल्यानंतर शहरात सुमारे पंधऱा दिवस एकही करोनाबाधित रुग्ण नव्हता. त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा करोनाचे रुग्ण आढळू लागले. 12 एप्रिल रोजी करोनाचा पहिला बळी शहरामध्ये गेला. त्यानंतर 21 एप्रिलला एका महिलेचा मृत्यू झाला.
एप्रिल व मे महिन्यामध्ये करोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होते. 31 मे पर्यंत शहरात 20 रुग्णांचा बळी गेला होता. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील 8 रुग्णांचा समावेश होता. तर शहराबाहेरील 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मे महिन्यामध्ये एकूण मृत्यूच्या 12.12 टक्के मृत्यू शहरात झाले होते. तर जून महिन्यामध्ये यामध्ये वाढ झाली. जून महिन्यामध्ये अनलॉकची प्रक्रिया शहरात सुरु करण्यात आली. त्यामुळे नागरिकांचा बाहेर वावर वाढला. रस्त्यांवर पुन्हा गर्दी होऊ लागली.
त्यामुळे करोनाचे संक्रमण देखील मोठ्या प्रमाणावर वाढले. 31 मे पर्यंत शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या 522 होती. जून महिन्यामध्ये यामध्ये वाढ होऊन जूनअखेर ही संख्या 3029 इतकी झाली. म्हणजेच एका महिन्यामध्ये 2507 इतके रुग्ण वाढले. तर जूनअखेरीस मृतांची संख्या 77 होती. म्हणजे जून महिन्यात 57 नागरिकांना आपला प्राण करोनामुळे गमवावा लागला. शहरातील एकूण मृत्यूपैकी 35 टक्के मृत्यू हे जून महिन्यामध्ये झाले.
जुलै महिन्यामध्ये करोना विषाणूने मागील महिन्यांचे सर्व उच्चांक गाठले. जुलै महिन्यामध्ये शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. जुलैच्या 12 दिवसांत शहरात 7267 रुग्णांना करोनाची बाधा झाली. त्यामध्ये दरदिवशी सुमारे 350 ते 400 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. तर मृतांच्या संख्येनेही नवीन उच्चांक गाठला. शहरामध्ये 13 जुलैपर्यंत तब्बल 86 नागरिकांचा मृत्यू झाला. एकूण मृतांच्या 53 टक्के मृत्यू हे अवघ्या 13 दिवसांत झाले आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.
महिना मृत्यू टक्के
मे – 20 12
जून – 57 35
जुलै – 86 53
एकूण – 163 100
रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मृत्यू वाढले आहेत. त्यामध्ये वेगळे काही कारण नाही. मे महिन्यामध्ये रुग्णांची संख्या कमी होती. त्यामुळे मृत्यूचा दर देखील कमी होता.
– संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त