आरोग्य सेतू ऍपमुळे महात्मा फुलेनगरचे रहिवासी चिंतेत
पिंपरी – करोना बाधित रुग्णाची माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने “आरोग्य सेतू’ ऍप तयार केले आहे. या ऍपद्वारे करोना बाधित रुग्ण आपल्या जवळपास आल्यावर ते ऍप आपल्याला सूचित करते.
पिंपरी-चिंचवड शहरातील महात्मा फुलेनगरमधील नागरिकांना तुमच्यापासून 500 मीटर अंतरावर करोना बाधित असल्याचे सतत दर्शवित आहेत. यामुळे येथील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
महात्मा फुलेनगरमध्ये अद्याप एकही करोना बाधित रुग्ण आढळलेला नाही. तरीदेखील येथील नागरिक योग्य ती खबरदारी घेत आहेत.
केंद्र शासनाच्या आवाहनानुसार येथील नागरिकांनी “आरोग्य सेतू’ हे ऍप डाऊनलोड केले आहे. मात्र येथील नागरिकांना तुमच्यापासून 500 मीटर अंतरावर करोना बाधित रुग्ण असल्याचे ऍपद्वारे सांगितले जात आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. आपल्या परिसरातील कोणी नागरिक करोना असल्याची माहिती लपवून तर ठेवत नाही ना, अशी शंका येथील नागरिकांना येत आहे.