पूरस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत : डॉ. दीपक मोडक

पुणे – धरणांमुळे पूर येत नाहीत, ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला हवी. धरणे ही पाणी अडवण्यासाठी बनवण्यात येतात. त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात आणि शेतीसाठी पाणी मिळते. अनेक पर्यावरणप्रेमी धरण बांधणीसाठी विरोध करतात. परंतु धरणच बांधली गेली नाहीत तर आपल्याला वर्षभर पाणी पुरवठा कोठून होणार? त्यामुळे धरणे बांधणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्य अभियंता आणि धरण सुरक्षा समितीचे सदस्य डॉ. दीपक मोडक यांनी केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग व दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या वतीने आयोजित “धरणांद्वारे पूर नियंत्रण – मिथक आणि सत्य’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. मोडक बोलत होते. शिवाजीनगर येथील दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय र. र., दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे प्रा. राजेंद्र सराफ उपस्थित होते.

डॉ. दीपक मोडक म्हणाले, यंदा सगळीकडे एकदाच पाऊस पडल्यामुळे अनेक धरणातून पाणी सोडावे लागले आणि पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेकांनी नदीपात्रात माती, राडारोडा, अवैध बांधकाम केल्यामुळे नदीचे पात्र अरुंद होत आहे. त्यामुळे वाहणाऱ्या पाण्याला अडथळे निर्माण होत आहेत. त्यातून पात्रातील पाणी बाहेर येते व पूर परिस्थिती निर्माण होते. तसेच नदीच्या पात्राच्या शेजारी ऊस शेती मोठ्या प्रमाणात केली जाते, यामुळेही पाण्याला अडथळा होतो. बंधारे किंवा पूल बांधताना नदी प्रवाहाला अडथळा होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. धरणाची उंची वाढवुन त्यामागे काही काळासाठी तरी पुरशोषण क्षमता निर्माण करता येत का याचा अभ्यास करायला हवा. प्रास्ताविक प्रा. राजेंद्र सराफ यांनी केले. सूत्रसंचलन विनय र. र. यांनी केले. शोभा नाहार यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)