मोरगांव – राज्य उत्पादन शुल्काच्या पुणे विभागाने दौंड तालुक्यातील कानगाव येथे गोवा राज्यात विक्रीस असलेल्या दारूची अवैध वाहतूक करताना रंगेहात पकडलेले आहे. सुमारे अडीच लाख रुपयांचा हा मुद्देमाल ताब्यात घेतला असून शासनाची मोठी महसूल हाणी टळली आहे. उत्पादन शुल्काच्या जी विभागाच्या युनीट दोनने ही कारवाई केली.
दौंड तालुक्यातील कानगाव रस्त्यावरून गोवा राज्यात विक्रीस असलेल्या दारुची अवैध वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक माहिती राज्य उत्पादन शुल्कास समजली. सदरची कारवाईची आखणी आयुक्त कांतीलाल उमाप, संचालक (अ.व द.) सुनील चव्हाण तसेच पुणे विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष झगडे तसेच उपअधीक्षक, संजय जाधव व संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एस. के. कान्हेकर, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, जी विभाग बीट क्र. २ पुणे यांनी केली.
या कारवाईत बी.व्ही. ढवळे निरीक्षक, विकास थोरात, सतीश काळभोर, दुय्यम निरीक्षक, तसेच सर्वश्री जवान चंद्रकांत इंगळे, मोहन गवळी, सोहन मालुसरे, नवनाथ पडवळ, वाहनचालक, प्रमोद खरसडे यांनी सापळा लावला होता. मिळालेल्या मागीतीनुसार, कानगांव –हातवळण रस्त्यावर, प्राथमिक शाळेजवळ संशयीत कार (क्र. एमएच १७ ए.जी ५७२४) यास थांबण्याचा इशारा करून कार बाजूला घेऊन कारमधील मुद्देमालची तपासणी केली.
गाडीमध्ये प्रथमदर्शनी खाकी रंगाचे बॉक्स दिसून आले. सखोल तपासणी केली असता मद्याचे बॉक्स असल्याचे आढळुन आल्यानंतर गाडी व मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहनाचा चालक प्रशांत अरूणराव भोर, ( वय ३१ वर्ष रा.काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर ) यास ताब्यात घेतले आहे. गाडीमध्ये मॅक्डोवल व्हीस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ०९ बॉक्स, इंम्पेरियल ब्लू व्हीस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ०४ बॉक्स, इम्पिरीअल ब्ल्यू व्हीस्कीचे १८० मि.ली. क्षमतेचे ०४ बॉक्स असे एकूण १७ बॉक्स जप्त करण्यात आले.
जप्त वाहन व मद्याची एकूण किंमत २ लाख ४३ हजार ५६० रुपये आहे. वरील आरोपींविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (क, ङ), ८१ व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना मे. न्यायालय दौंड, जि. पुणे येथे हजर करण्यात आले. या विभागाने वारंवार अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक एस. के. कान्हेकर हे करीत आहेत.