प्लॅस्टिक विक्रेत्यास सापळा रचून पकडले

20,000 रुपये प्रशासकीय शुल्क वसूल

विश्रांतवाडी – हातगाडी व पथारी व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक कॅरीबॅग विकत असताना एका विक्रेत्यास पकडण्यात आले. कारवाईदरम्यान त्या विक्रेत्याकडून 78.397 किग्रॅ प्लॅस्टिक जप्त करून 20,000 रुपये प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले.

सदर विक्रेता हा प्रभाग क्रमांक एकमधील विश्रांतवाडी परिसरात कधी सकाळी, कधी दुपारी तर कधी रात्री-अपरात्री येऊन व्यावसायिकांना 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक कॅरीबॅग विकत असे. याबाबत येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रिय कार्यालयातील आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना माहिती मिळाली. त्या माहितीनुसार त्यांनी त्याच्यावर पाळत ठेवून सापळा रचला होता. सदर विक्रेत्यास पकडण्यात अखेर त्यांना यश आले. विक्रेत्याकडून विश्रांतवाडी परिसरातील विक्रेत्यांना विकत असताना त्याच्याजवळ असणारे 25 किलो प्लॅस्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. त्यानंतर विक्रेत्याच्या राहत्या घरी जावून लपविलेले 53.397 किग्रॅ प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. एकूण 78.397 किग्रॅ प्लॅस्टिक जप्त करून 20,000 रुपये प्रशासकीय शुल्क वसूल करण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्‍त ज्ञानेश्‍वर मोळक यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका सहायक आयुक्‍त विजय लांडगे, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरूपती पांचाळ यांच्या नियंत्रणाखाली कारवाई करण्यात आली. सदर कारवाईमध्ये वरिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय घावटे, आरोग्य निरीक्षक संदीप पवार, अमोल म्हस्के, मोकादम सेवक अण्णासो रास्ते, दिलीप चव्हाण, सचिन सकट, सचिन गायकवाड व भीमराव गायकवाड यांचा सहभाग होता.

आगामी काळातही कारवाई सुरूच राहणार असून नागरिकांनी प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेचे सह आयुक्‍त ज्ञानेश्‍वर मोळक यांनी केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)