कोंबडीच्या पिल्लाची शिकार केली म्हणून मांजरीला गोळ्या घालून ठार; जळगावमधील खळबळजनक घटना

जळगाव:  जळगावमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एक व्यक्तीने कोंबडीच्या पिल्लाची शिकार केली म्हणून मांजरीला चक्क गोळ्या घालून ठार केल्याची खळबळजनक  घटना समोर आली आहे. जळगावात ही घटना घडली असून मांजरीच्या मालकाने या घटनेचा व्हिडीओ शूट केला होता. यामध्ये माजंरीच्या कपाळाला गोळी लागली असून ती रक्तबंबाळ अवस्थेत तडफडताना दिसत आहे. तर दुसरीकडे आरोपी मात्र कोणताही पश्चात्ताप व्यक्त न करता कुटुंबासोबत वाद घालताना दिसत आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्व स्तरातून टीका करण्यात येत आहे.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. जळगाव शहरातील योजना नगर भागात हेमराज सोनवणे आणि पुष्कराज बानाईत शेजारी राहतात. पुष्कराज बानाईत हे परिसरातील भटक्या मांजरीचे संगोपन करतात. तर हेमराज कोंबड्या पाळून आपला उदरनिर्वाह करतात.

दरम्यान पुष्कराज बानाईत यांची मांजर गेल्या काही दिवसांपासून कोंबड्यांची शिकार करत असल्याने हेमराज संतापले होते. त्यातच मांजरीच्या पिल्लाने त्यांच्यासमोर कोंबडीचे पिलू मारल्याने त्यांचा संताप अनावर झाला. यानंतर त्यांनी छर्रेच्या बंदूकीतून गोळी घालून मांजरीवर निशाणा साधला. मांजराच्या डोक्यात गोळी लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

गोळी घातल्यानंतर बानाईत कुटुंबाने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. यावेळी मांजर रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडल्याचं दिसत असून दुसरीकडे आरोपी हेमराज हातात बंदूक घेऊन उभा असल्याचं दिसत आहे.

विशेष म्हणजे तो अजून एकदा गोळी घालण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान यावेळी जाब विचारला असता तुमच्या सर्व मांजरी मारून टाकेल आणि तुम्हाला ही पाहून घेईल अशी धमकीही दिली. बानाईत कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हेमराज सोनावणे याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.