नगर बाह्यवळण रस्त्याची झालीय चाळणी

अनेक ठिकाणी डांबरही झाले गायब; अधिकारी, ठेकेदाराचे कामाकडे होतेय दुर्लक्ष
जयसिंग यादव

नगर – सर्वत्र खड्डेच खड्डे, कोठे एक फुटाचे तर कुठे पाच-सहा मीटर लांबी-रुंदीचे. त्यामुळे रस्ता खड्ड्यात की खड्डे रस्त्यात, असा प्रश्‍न वाहनचालकांना पडला आहे. रस्त्याची अक्षरशः चाळणी झाल्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रस्त्यावरून मोटार सायकलही चालविणे अवघड बनले असून, अवजड वाहनांची अवस्था काय असेल, यांची कल्पनाही करता येत नाही. रस्त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने असलेल्या अपघातांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

नगर शहरातून होणारी अवजड वाहतूक व त्यामुळे होणारे अपघात, त्यात झालेला अनेकांचा मृत्यू, तसेच काहींना आलेले अपंगत्व, यामुळे ही वाहतूक शहरातून बाहेर वळविण्यासाठी वाह्यवळण रस्त्याची निर्मिती केली गेली. मात्र सध्या या रस्त्याचीही प्रचंद दुरवस्था झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची खंत ना खेद अशी परिस्थिती आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या विळदघाट ते वाळुंज (सोलापूर रोड) या बाह्यवळण रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी हा रस्ता खचलेला आहे. या बाह्यवळण रस्त्याच्या दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या. यामध्ये विळदघाट ते नेप्ती कांदा मार्केट व नेप्ती कांदा मार्केट ते वाळुंज (सोलापुर रस्ता). विळद ते नेप्ती कांदा मार्केटचे काम मागील एक वर्षापासून संथ गतीने सुरू आहे, तर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिते अगोदर नेप्ती मार्केट ते वाळुंज (सोलापूर रस्ता) या 15.600 किलोमीटर रस्त्याला 20 कोटी प्रशासाकीय मान्यता मिळून 17 कोटी 51 लाखांची तांत्रिक मंजुरी मिळाली. त्याचा कार्यारंभ आदेश निघालेला असताना गेल्या दोन महिन्यांपासून बाह्यवळण रस्त्याच्या कामास सुरुवातच झालेली नाही. या बाह्यवळण रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत आहे. रस्त्यावर सुमारे एक फूट खोलीचे खड्डे पडलेले आहेत, तर अनेक ठिकाणी डांबरी रस्ताच शिल्लक न राहता नुसती खडीच शिल्लक राहिली आहे.

सोलापूर, नगर, मनमाड या महामार्गांवरून दिवस-रात्र मोठे व अवजड वाहतूक सुरू असते. बाह्यवळण रस्ता खराब झाल्यामुळे अनेक वाहने शहरामधून घुसत आहेत. त्यामुळे शहरात अनेक अपघात होऊन अनेकांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत. बाह्यवळण रस्त्यावर खड्ड्याबरोबरच धुळीचे साम्राज्य निर्माण झालेले असल्याने रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.

सदर कामाचा कार्यारंभ आदेश लोकसभा निवडणुकी अगोदरच निघालेला आहे. ठेकेदारास काम सुरू करण्याच्या नियोजनासाठी वेळ लागतो हे एकीकडे शाखा अभियंता सांगतात, तर दुसरीकडे त्यांचेच वरिष्ठ उपविभागीय अधिकारी म्हणतात की कार्यारंभ आदेश निघाली की नही, हे मला माहीत नाही.

आपण माझ्या वरिष्ठांना विचारा, अशी विसंगत माहिती दिली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच कार्यारंभ आदेश निघण्याबाबत विसंगत माहिती दिली जात असेल, तर या अधिकाऱ्यांचे रस्त्यांच्या कामाकडे किती लक्ष आहे, याची प्रचिती येते. रस्त्याचे कामे किती दर्जेदार होईल, याबाबतही शंका उपस्थित होत आहे.

अधिकारी व ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे बाह्यवळण रस्त्याचे काम दिवाळीपर्यंत होणार नाही. जूनमध्ये पाऊस सुरू झाल्यानंतर हा रस्ता अवजड वाहतुकीसाठी कुचकामी ठरणार असून, त्यामुळे पुन्हा ही वाहतूक शहरात येईल. त्यामुळे या काळात शहरात अपघात झाल्यास त्यास अधिकारी जबाबदार राहतील.

राजेंद्र परकाळे माजी जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेट

बाह्यवळण रस्त्याचे काम लवकर सुरू न झाल्यास दरेवाडी, वाकोडी, वाळुंज, अरणगाव मधील ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील. बाह्यवळण रस्त्याचे काम वेळेत सुरू न झाल्यास व अपघातात कुणाचा बळी गेल्यास अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे.

अनिल करांडे, सरपंच, दरेवाडी

बाह्यवळण रस्त्यांच्या कामाची वर्कऑर्डर झाली की नाही, हे मला सांगता येणार नाही. मला काहीही माहिती नाही. आपण याबाबतची माहिती वरिष्ठांकडून घ्यावी.

एम. एच. कसबे उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

बाह्यवळण रस्त्याचे काम घेतलेल्या ठेकेदाराला नियोजनासाठी वेळ द्यावा लागतो. कामाची मुदत एक वर्षाची आहे. पावसाळ्याअगोदर ठेकेदाराने एक ते दोन किलोमीटरवरील खड्डे बुजविलेले आहेत.

डी. एम. बांगर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

बाह्यवळण रस्त्यांच्या प्रश्‍नाबाबत अधिकारी व ठेकेदाराचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे. रस्त्याच्या कामाबाबत जनता रस्त्यावर आल्यास आंदोलकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल केले जातात. ई-टेंडरच्या नावाखाली अधिकारी कोणालाच दाद देत नाहीत. त्यामुळे अपघातात कोणाचा जीव गेल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर व ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.

रामदास भोर सभापती, पंचायत समिती, नगर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.