मांजरसुंब्यास संत तुकाराम वनग्राम पुरस्कार

नगर – राज्य सरकारच्या संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत नगर तालुक्‍यातील मांजरसुंबा गावास राज्यस्तरावर प्रथम पुरस्कार चंद्रपूर येथील इंदिरागांधी सभागृहात वन राज्य मंत्री परिणय फुके यांच्या हस्ते सरपंच जालिंदर कदम, उपसरपंच पांडुरंग कदम, सहाय्यक वन संरक्षक रमेश देवखिळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल थिटे, वनपाल शैलेश बडदे, ग्रामसेवक सुर्यभान सौदागर, तुकाराम कदम, विलास भूतकर, योगेश कदम आदी उपस्थित होते. वनसंवरक्षण आणि व्यवस्थापनात स्थानिक नागरिकांचा सहभाग घेण्यासाठी वन विभागाने गावात संयुक्त वनव्यवस्थापन समित्या स्थापन केल्या आहेत.

या समित्यांनी वनांचे संरक्षण करणे, अवैध वृक्षतोड, वनक्षेत्रातील अतिक्रमणे, वणवा, अवैध चराई या प्रकारांचा बंदोबस्त करणे अपेक्षित आहे; तसेच त्यांच्याकडे असलेल्या वनांचे व्यवस्थापन करणे, ग्रामीण जनतेत जनजागृती करण्याचेही कामही समित्यांनी करावे. या कामांत समित्यांमध्ये चुरस निर्माण होण्यासाठी ही योजना वन विभागाने सुरू केली आहे. या योजनेत जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समित्यांना दरवर्षी पुरस्कार दिले जातात.

या योजनेत यंदा नगर तालुक्‍यातील मांजरसुंबा गावाने प्रथम क्रमांक पटकावला. मांजरसुंबा संयुक्त वनव्यवस्थापन समितीला 100 गुण मिळाले; तसेच नाशिक जिल्ह्यातील गवळीपाडा आणि हिंगोली जिल्ह्यातील येलदरी या गावांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. राज्यातील सुमारे 15 हजार 600 गावांपैकी 12 हजार 661 गावांमध्ये संयुक्‍त वनव्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यापैकी मांजरसुंबा हे राज्यात पहिले आले असून संत तुकाराम वनग्राम पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप 10 लाख व सन्मानचिन्ह देण्यात आले आहे. यावेळी अंगणवाडी सेविका छाया कदम, रोहिणी कदम, अशाबाई कदम, रंजना कदम, मंगल कदम, चंद्रभान कदम, धोंडीभाऊ कदम, कानिफनाथ कदम आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)