बीडमध्ये बोगस मतदानावरून दोन गटात राडा

बीड – राज्यभरात लोकशाहीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सामान्य नागरिकांसह, राजकारणी आणि सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत. मात्र मतदानाच्या वेळी काही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याची तर काही ठिकाणी दोन गटात राडा झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संदीप क्षीरसागर आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर गटात बोगस मतदारांवरुन जुंपली.

पाटोदा मतदारसंघातून बीड मतदारसंघात बोगस मतदार मतदानासाठी आणल्याचा आरोप आहे. हे 10 ते 15 मतदार जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील कर्मचारी असल्याचे कळले. ओळखपत्रावरील फोटो आणि मतदार यांचे फोटो जुळत नसल्याने हा प्रकार समोर आला. हा प्रकार घडला त्यावेळी संदीप क्षीरसागर उपस्थित होते. दरम्यान, हे कर्मचारी खरंच जयदत्त क्षीरसागर यांच्या संस्थेतील आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, जयदत्त क्षीरसागर यांनी हे सगळे आरोप फेटाळले आहेत.

बीड मतदारसंघात काका-पुतण्या अशी लढत होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून संदीप क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांना शिवसेनेच्या जयदत्त क्षीरसागर यांचे आव्हान आहे. निवडणुकीच्या मैदानात हे काका-पुतण्या एकमेकांच्या विरोधात उभे असले तरी त्यांचे वास्तव्य एकाच घरात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)