विज्ञानविश्‍व: कॅसिनी आणि शनीची कडी

डॉ. मेघश्री दळवी

शनी ग्रहाचा उल्लेख आला की पहिली आठवते ती त्याची कडी. पाहिल्यावर एकदम भव्य-दिव्य वाटणारी. आपल्या पृथ्वीला अशी कडी असती तर आपल्याला आकाशात कशी दिसली असती, याची हळूच कल्पना करायला लावणारी.
नासाने ऑक्‍टोबर 1997 मध्ये कॅसिनी यान अवकाशात सोडलं. त्यामागे शनी, त्याचे उपग्रह, वातावरण, आणि त्याची कडी यांचा अभ्यास करण्याचा उद्देश होता. मुळात या मोहिमेचे दोन भाग होते, कॅसिनी यान आणि हायगेन्स प्रोब. 2004 मध्ये हायगेन्स कॅसिनीपासून वेगळा झाला आणि 2005 मध्ये टायटन या शनीच्या चंद्रावर उतरला. शनीनिरीक्षणाची पुढली कामगिरी कॅसिनीने पार पाडली.

अठ्ठावीस देशांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही मोहीम पूर्ण यशस्वी झाली असं म्हणता येईल. जवळजवळ वीस वर्षे चाललेल्या या मोहिमेत कॅसिनीने शनीजवळ जाऊन त्याची लक्षावधी छायाचित्रं घेतली. सप्टेंबर 2017 मध्ये या मोहिमेची अखेर होताना कॅसिनीला शनीच्या वातावरणात उतरवून देण्यात आलं आणि तिथे हे यान नष्ट झालं.
शनीची कडी अब्जावधी लहानमोठ्या खडकांनी बनलेली आहे. अतिशय वेगाने ही कडी शनीभोवती फिरतात. ती कायम बदलत असतात. कधी त्यांच्यामध्ये नव्या खडकांची भर पडते तर, कधी त्यातले खडक तुटून जातात. ही कडी सलग नाहीत, त्यांच्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या फटी आहेत. कॅसिनीने या मोकळ्या जागांमध्ये प्रवेश करून आतल्या बाजूने कड्यांची छायाचित्रं घेतलेली आहेत.

कॅसिनीने पाठवलेल्या माहितीचं विश्‍लेषण गेली दोन वर्षे सुरू आहे आहे. त्यातून शनीच्या कड्यांविषयी नवनवे उलगडे होत आहेत. शेवटी शनीच्या वातावरणात उडी घेताना कॅसिनीने पाठवलेल्या माहितीनुसार सिद्ध होतं आहे की, या कड्यांची निर्मिती केवळ दहा कोटी वर्षांपूर्वी झालेली आहे. त्यातली काही कडी तर फक्त एक कोटी वर्षांइतकीच जुनी आहेत. शनी हा ग्रह अंदाजे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला असल्याने, त्याला कडी खूप उशिराने मिळाली आहेत हे स्पष्ट होतं. आता ही कडी कुठून आली यावर शास्त्रज्ञांचं लक्ष आहे.

या कड्यांमध्ये अनेक बर्फाळ तुकडे आहेत. वेगाने फिरताना ते शनीकडे खेचले जात आहेत, त्यांच्यातून बर्फाचे खडे निघून शनीवर पडत आहेत आणि त्यामुळे कड्यांमधील एकूण वस्तुमान नियमितपणे घटत चाललं आहे. कॅसिनीचं हे निरीक्षण बरंच धक्‍कादायक आहे. यामागे गुरुत्वाकर्षणाच्या जोडीने शनीचं चुंबकीय क्षेत्र आणि अवकाशातली विकिरणं (रेडिएशन) आहेत. या सर्व माहितीवरून केलेल्या गणितानुसार येत्या तीस कोटी वर्षांमध्ये शनीची कडी नाहिशी होतील असा अंदाज आहे. शनीची कडी अगदी अलीकडची आहेत आणि कदाचित काही काळानंतर नसतीलही ही कल्पना करणं आपल्याला खरोखरच कठीण आहे.

आपल्या सूर्यमालेत शनीच्या जोडीने गुरू, युरेनस आणि नेपच्यूनला लहान फिकट कडी आहेत. शनीच्या कड्यांविषयी अशी विलक्षण माहिती मिळाल्यावर इतर ग्रहांची कडी कशी आहेत याबाबत कुतूहल वाढलं आहे. कदाचित या ग्रहांना आधी शनीसारखी तेजस्वी कडी असतील आणि ती हळूहळू नष्ट होत चालली असतील, ही शक्‍यता आहे खरी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.