पुणे – डेक्कन पोलीस ठाण्णे हद्दीत कॅसिनोसदृश्य जुगार अड्डयावर गुन्हे शाखेने छापा टाकला. यामध्ये अड्ड्याच्या दोन मालकांसह 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अड्डा नुकताच थाटण्यात आला होता. तेथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी नेमले होता. विशेष म्हणजे, डेक्कन पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर मध्यवर्ती जागेत हा अड्डा होता.
हा अड्डा डेक्कन जिमखाना येथील पी.के.बिर्याणीजवळील पोरवाल इमारतीत होता. गुन्हे शाखेच्या युनिट-1 च्या पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी यांनी फिर्याद दिली आहे. थॉमस लोबो व प्रफुल्ल देवकुले असे जुगार अड्डा मालकांचे नाव आहे. त्यांच्यासह तेथे काम करणाऱ्या युनुस अलीउद्दिन (33, रा. पिंपरी), ओमप्रकाश मिश्रा (48, रा. पिंपरी), बलिकुमार मंडल (19, रा. खडकी), सलमान नसरुद्दीन खान (21, रा. पिंपरी), संदीपचंद्र गोवेकर (42, रा. पिंपरी), भुवन ओझा (29, रा. पिंपरी), सुरेश चंद्र (36, रा. पिंपरी), राघवेंद्र प्रताप (45, रा. पिंपरी), आलेंद्र मिस्टा (35, रा. पिंपरी), नवनाथ गावडे (26, रा. पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन रोख 20,500 आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
“कलेक्शन’ची कामे करणाऱ्यांशी “कनेक्शन’
पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर नवीन पोलीस अधिकारी चार्ज घेतपर्यंत मिळालेली संधी साधत असे अड्डे शहरातील अनेक भागात सुरू झाले आहेत. यामुळे गुन्हे शाखेने थेट कारवाई सुरू केली आहे. काही पोलीस ठाण्यातील “कलेक्शन’ची कामे करणाऱ्यांना विश्वासात घेत असे प्रकार सुरू आहेत.