चेन्नई : लॉटरी किंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सँटियागो मार्टीन याच्याशी संबंधित विविध राज्यांतील ठिकाणांवर शुक्रवारी ईडीने छापे टाकले. त्यावेळी मार्टीनच्या चेन्नईतील कार्यालयातून तब्बल ८.८ कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने काही काळापूर्वी निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य ठरवली. त्या रोख्यांवरून मार्टीनचे नाव देशभरात चर्चेचा विषय बनले.
तब्बल १ हजार ३०० कोटी रूपयांचे रोखे खरेदी करणाऱ्या मार्टीनचे नाव त्यावेळी राजकीय पक्षांचा सर्वांत मोठा देणगीदार म्हणून पुढे आले. संपूर्ण देशाला चकित करणारा चेन्नईस्थित मार्टीन मनी लॉण्डरिंगच्या आरोपावरून ईडीच्या रडारवर आला आहे. त्या केंद्रीय यंत्रणेने मार्टीन आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्यांच्या २० ठिकाणांवर छापे टाकले. ती कारवाई तामीळनाडूतील चेन्नई आणि कोईम्बतूर, हरियाणातील फरीदाबाद, पंजाबमधील लुधियाना आणि पश्चिम बंगालमधील कोलकत्यात ती कारवाई करण्यात आली. मोठे बिझनेस एम्पायर उभारणाऱ्या मार्टीनचे चेन्नईत कॉर्पोरेट ऑफिस आहे. तिथून ईडीच्या पथकाने रोकड हस्तगत केली.
लॉटरी विक्रीतून मोठा घोटाळा केल्याचा मार्टीनवर आरोप आहे. त्याच्या अवैध कारनाम्यांमुळे सिक्कीम सरकारला ९०० कोटी रूपयांचे नुकसान झाले. फ्युचर गेमिंग ही मार्टीनची कंपनी सिक्कीम लॉटरीची प्रमुख डिस्ट्रीब्युटर होती. त्या प्रकरणी ईडीने मागील वर्षी ४५७ कोटी रूपयांची मालमत्ता जप्त केली. याआधी मार्टीनच्या चेन्नईतील घरातून ७.२ कोटी रूपयांची बेहिशेबी रोकड हस्तगत करण्यात आली होती. त्याच्या बांधकाम आणि जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित कंपन्याही आहेत.