बीड : फेसबुकवर पोस्ट लिहून आत्महत्या केलेल्या शिक्षक धनंजय नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी संस्थाचालक पिता-पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून संस्था चालकासह इतर काही जणांचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्या केली होती. या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली होती.
बीड जिल्ह्यातील एका आश्रम शाळेतील शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र तक्रार दाखल न करून घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी अविनाश पाठक समाज कल्याण अधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील देवगाव येथील धनंजय नागरगोजे हे विठ्ठलगड शिक्षण संस्थेच्या काळेगाव येथील आश्रम शाळेवर १८ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांना आजतागायत वेतन नव्हते. त्यांनी वेतनाबाबत विक्रम मुंडे यांना विचारणा केल्यानंतर ‘तू फाशी घे’ असे उत्तर दिल्याचे आत्महत्यापूर्वी धनंजय नागरगोजे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे. यांच्या हातून हाल होऊन मरण्यापेक्षा स्वतः मेलेले बरे अशी पोस्ट त्यांनी ता. १४ मार्चला केली होती.
तर, आत्महत्येच्या पुर्वसंध्येला आपली तीन वर्षांची मुलगी श्रावणीची माफी मागून स्वतःचा होणारा छळ आणि त्याला कारणीभूत असलेल्यांची नावे टाकून त्यांनी पोस्ट लिहीत कृष्ण अर्बन बँकेच्या आवारात धनंजय नागरगोजे या शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटना घडल्यानंतर कोणीही या प्रकरणात तक्रार न देण्यासाठी पुढे न आल्याने गुन्हा दाखल झाला नाही. मात्र किमान वेतन कायदा डावलल्या प्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करा. तसेच संबंधित संस्थाचालक यांच्या विरुद्ध देखील आत्महत्येस जबाबदार असल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असता या प्रकरणी आता हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.