संगमनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यातील जोर्वे येथील प्रवरा नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. शुक्रवारी (दि 20) रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जोर्वे गावातून वाळू घेऊन जाणारा पिकअप निंबाळे चौफुलीवर पकडली.
यात पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला असून 2 लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
अनिकेत भारत जोर्वेकर या वाळूतस्करावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निंबाळे चौफुली येथे विना क्रमांकाची पिकअप गाडी वाळू घेऊन जात असताना संगमनेर शहर पोलीस आणि नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
त्याच्याकडून 2 लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सध्या जोर्वेच्या प्रवारा नदीतून राजरोसपणे बेसुमार वाळू उपसा सुरू आहे.
जोर्वे गावात विविध राजकीय पक्षाचे पुढारी बेसुमार वाळू उपसा करताना आढळून येत आहे, मात्र राजकीय दबावातून कारवाई केली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
या वाळूतस्करांवर कारवाई न केल्यास उपोषण करण्याचा इशारा गावातील ग्रामस्थांनी दिला आहे. राजरोसपणे जोर्वे गावातून हा वाळू उपसा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या आशीर्वादाने चालू असून ,त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांवर वाळूचे गुन्हे दाखल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.