पुणे : सोसायटीच्या आवारातील तीन मांजरे दुसऱ्या ठिकाणी(रिलोकेटेड) सोडण्यासाठी सोसायटीच्या फंडातून २४०० मंजुर केल्याप्रकरणी सोसायटीच्या चेअरमनसह चौघांविरुध्द वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी प्राणीप्रेमी कार्यकर्तो मोनिका छेत्री (३०,रा.लोहगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार एक महिला,शेख, अर्जुन प्रसार, चेअरमन लोखंडवाला (सर्व रा. गंगामेल सोसायटी, सोपानबाग) यांच्याविरुध्द प्राणीक्रुरता अधिनियम १९६० चे कलम ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी व्हॉटसअपवर चॅटींग चेक करत असताना, त्यांना एक मेसेज आला. त्यामध्ये सोसायटीच्या आवारात असणारी तीन मांजरे सोसायटीच्या सदस्यांनी पंधरा किलोमीटर लांब जंगलात सोडून दिली आहेत. यासाठी एका व्यक्तीस प्रत्येकी मांजरामागे ८०० रुपये दिले आहेत. त्यांना पोत्यात भरुन निर्दयपणे रिलोकेटेड करण्यात आली आहेत.
त्यांनी याची खातरजमा केल्यावर सोसायटीचे चेअरमन लोखंडवाला यांनी सोसायटीच्या फंडातून २४०० रुपये मंजुर केल्याची माहिती मिळाली. त्यानूसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक इनामदार करत आहेत.