मुंबई : बॉलिवूडमधील बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे जावई आणि एस्कॉर्टस् कुबोटा लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक निखिल नंदा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल नंदा यांच्यावर फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर खटला दाखल करण्यात आला. निखिल नंदा यांच्यासोबतच 9 जणांविरोधात फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे सीएमडी निखिल नंदा, फर्मचे उत्तर प्रदेश प्रमुख, क्षेत्र व्यवस्थापक, विक्री व्यवस्थापक, शाहजहांपूर डीलर आणि इतर तीन अधिकाऱ्यांची नावे यात समाविष्ट आहेत. त्यांच्यावर ट्रॅक्टर एजन्सीचे मालक जितेंद्र सिंह यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पापड हमजापूर गावातील रहिवासी ज्ञानेंद्र यांनी ही तक्रार दाखल केली आहे. ज्ञानेंद्र यांचा भाऊ जितेंद्र सिंह दातागंजमध्ये जय किसान ट्रेडर्स नावाची ट्रॅक्टर एजन्सी चालवत होते.
सुरुवातीला जितेंद्र त्यांचा सहकारी लल्ला बाबू यांच्यासोबत व्यवसाय सांभाळायचा. पण, कौटुंबिक वादामुळे बाबू तुरुंगात गेल्यानंतर जितेंद्र एकटेच एजन्सीचे काम सांभाळत होते. ज्ञानेंद्र यांनी आरोप केला की, निखिल नंदा यांनी कंपनीचे अधिकारी आशिष बालियान (एरिया मॅनेजर), सुमित राघव (सेल्स मॅनेजर), दिनेश पंत (यूपी हेड), पंकज भास्कर (फायनान्स कलेक्शन ऑफिसर), अमित पंत (सेल्स मॅनेजर), नीरज मेहरा (सेल्स हेड) आणि शिशांत गुप्ता (शाहजहांपूर डीलर) यांच्यासह जितेंद्रवर विक्री वाढवण्यासाठी वारंवार दबाव आणला.
तसेच विक्रीचे लक्ष्य पूर्ण न झाल्यास डीलरशिप परवाना रद्द करण्याची आणि त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याची धमकी दिली होती. यामुळे जितेंद्र खूप तणावाखाली होते. यानंतर 22 नोव्हेंबर रोजी जितेंद्र यांनी आत्महत्या केली, असे तक्रारीत म्हटले आहे.