बेंगळूरु – “पीएम-केअर्स’निधीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करणारे ट्विट कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून पोस्ट केल्याबद्दल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात प्रवीण के.व्ही. यांनी तक्रार दाखल केली होती. कॉंग्रेस पक्षाच्या ट्विटर हॅन्डलवरील पोस्टद्वारे बिनबुडाचे आरोप केले जात असून समाजामध्ये अशांतता निर्माण केली जात आहे, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार शिवमोग्गा जिल्ह्यातील सागरा गावातील पोलिसांनी प्रकरण दाखल करून घेतले आहे.
राज्य कॉंग्रेसने हा गुन्हा नोंदवल्याचा निषेध केला आहे. भारतीय दंड संहितेच्या 153 आणि 505 (1),(बी) या कलमांखाली चिथावणी देणे आणि अन्य गटाविरोधात गुन्हा करण्यास भडकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 11 मे रोजी कॉंग्रेसच्या ट्विटरवर “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएम-केअर्स निधीचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या ट्विटवरून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि हे ट्विटर अकाउंट हाताळणाऱ्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.